हरिदास ढोक
देवळी(वर्धा) : आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आणि उत्पादनानुसार ठरविण्यात येणाऱ्या कापसाच्या भावबाजीला सध्या अवकळा आली आहे. कापसाच्या या व्यवसायात सट्टेबाजाराचा हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या मनमर्जीतून भावाबाबतची तेजी-मंदी ठरविली जात आहे. नव्हे तर कापसाचे संपूर्ण मार्केट सट्टेवाले चालवित असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मागील हंगामातील १४ हजारांचा भाव या हंगामात प्रतिक्विंटल ८ हजारापर्यंत खाली आला आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या भावाचा अंदाज घेता यावेळी शुभारंभाला १० हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु या अपेक्षेवर विरजण पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.
या हंगामातील अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणात येणाऱ्या कापूस व सोयाबीनच्या पिकाने यावेळी धोका दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी नावाचीच झाली आहे. त्यातच शेतमालाच्या भावबाजीचा फटका बसत असल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीच्या देशांनी परस्परांमध्ये असलेली व्यापाराची बंदी हटविल्याने सध्या हा बाजार अस्थिर झाला आहे. शिवाय दक्षिणेत सूत निर्मितीच्या मालाला उठाव नसल्याने हा माल पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत कापसाचे भाव अजून खाली येऊन मंदीचे सावट राहणार असल्याचे बोलले जात आहे. गादी-रजई व इतर कामे करणाऱ्या रेचे चालकांनी येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी येऊन हे भाव प्रतिक्विंटल १२ हजारांपर्यंत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सट्टेबाजाराचा वाढता हस्तक्षेप तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या भावबाजीच्या चढउतारामुळे कापूस उत्पादक भरडला जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेऊन असलेले व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीला हीच परिस्थिती कारणीभूत आहे.