आनंद इंगोले
वर्धा : मृग नक्षत्र लागून आता आठ दिवसांचा कालावधी लोटला तरीही मान्सूनचा अद्याप पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अजूनही पावसाचे काहीच खरे नसल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीकरिता ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ३२ हजार ४४५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन असून सोयाबीनचे क्षेत्र दरवर्षीप्रमाणेच जास्त आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध व्हावी म्हणून मागणीही करण्यात आली. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी आणि मका या पिकांच्या ६३ हजार ३४७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असता जिल्ह्याला ६६ हजार ८४५ क्विंटल बियाणे उपल्बध झाले आहे. तर रासायनिक खतांचीही मागणीनुसार जिल्ह्याला उपलब्धता झाली आहे. १ लाख ०७ हजार ११५ मेट्रिक टन रासानिक खताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ९१ हजार ७८३ मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. परंतु अद्याप पावसाचे आगमनच झाले नसल्याने शेतकऱ्यांनीही बी-बियाणे व खते खरेदीला ब्रेक दिला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पावसाची तर कृषी केंद्र चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.
बियाणे व रासायनिक खतांची आवश्यकतेनुसार जिल्ह्यात उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी केंद्रातूनच बियाणे, रासयनिक खते व कीटकनाशकांची खरेदी करावी. विशेषत: जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जि. प. वर्धा.
-----------------------------------