नरबळी प्रकरण : लहूजी शक्ती सेनेचे आंदोलनआर्वी : कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नरबळी देण्याचा अयशस्वी प्रकार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव(रेल्वे) तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रम शाळेत घडला. त्यामुळे शंकर महाराज आश्रम शाळेतील ट्रस्टीवर कारवाई करून या आश्रम शाळेची मान्यता रद्द करावी. सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेद्वारे आर्वी येथील उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ११ वर्षांचा प्रथमेश सगणे या मातंग समाजाच्या मुलाचा आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी गळा कापून अघोरी विद्या प्राप्त करण्याकरिता जीव घेण्याचा प्रयत्न झाला. सदर प्रकरणात शंकर महाराज व आश्रम शाळेतील ट्रस्टींचा सहभाग होता. यापूर्वी अजय वनवे या मुलाचाही नरबळी देण्याचा प्रयत्न झाला होता. असे प्रकार शंकर महाराज आश्रम शाळा, पिंपळखुटा येथे वरचेवर होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सी.आय.डी. चौकशी करून मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्यसंघटक अॅड. गणेश हलकारे यांनी पिंपळखुटा नरबळी प्रकरणाचा पंचनामा या विषयावर मार्गदर्शन केले. आंदोलनात लहूजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉ. रूपेश खडसे विदर्भ कार्याध्यक्ष लहानुजी इंगळे, राजेश अहीव, दिलीप पोटफोडे, दशरत जाधव, दिलीप पोटफोडे, राजेश अहीव, सुधाकर लाडंगे, मंगेश लाडंगे, बबन गायकवाड, मंगेश प्रधान, संग्राम कळणे, पंकज जाधव, सुनील संतापे, गौरी वाघमारे, विनय इंगळे, अनिल पोटफोडे, अक्षय कांबळे, सतीश पिठे, किशोर बावणे आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)
शंकर महाराजांच्या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी
By admin | Published: September 08, 2016 12:45 AM