फणींद्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या स्वार्थासाठी सुरू केलेली नॅरोगेज शकुंतला रेल्वे गेल्या २० वर्षांपासून बंद आहे. भारत सरकारने शकुंतलेला ब्रॉडगेजमध्ये बदलून सुरू करण्याच्या हालचाली सुरू करताच ब्रिटिश शासन काळात ज्या कंपनीशी १०० वर्षांचा करार होता, त्या कंपनीने आता जागेच्या मोबदल्याची मागणी केली. कराराची मुदत संपली असली, तरी कंपनीने शकुंतला तुमची असली तरी, त्या रेल्वे ज्या जागेवर आहे, त्या जागा आमच्या मालकीच्या असून त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही रेल्वे सुरू करू शकत नाही, असा अफलातून दावा केल्याची माहिती आहे.
ब्रिटिश काळात विदर्भातील लांब धाग्यांचा कापूस मुंबई व तेथून मँचेस्टरला नेण्यासाठी विदर्भात यवतमाळ-मूर्तिजापूर, मूर्तिजापूर- अचलपूर आणि आर्वी ते पूलगावपर्यंत तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. त्या चालविण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या देशातील क्लिक निक्सन अँड कंपनीशी १०० वर्षांचा करार केला होता.
कंपनीला रेल्वे लीजवर देण्यात आल्या होत्या. हा करार १९०३ मध्ये करण्यात आला होता. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर बरीच वर्षे भारत सरकारच्या रेल्वे विभागाने त्या सुरू ठेवल्या होत्या. मात्र, १९९९च्या दरम्यान काही कारणाने त्या बंद पडल्या होत्या.
देशाचा पौराणिक वारसा म्हणून व वाहतुकीची गरज म्हणून या रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात, असा रेटा वाढल्यानंतर शासनाने त्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यवतमाळ ते मूर्तिजापूर या शकुंतलेचे नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, क्लिक निक्सन अँड कंपनीने त्याला हरकर घेतली. या कंपनीचे नवीन नाव 'सेंट्रल प्रोईनान्सेस रेल्वे कंपनी' असे आहे.
या कंपनीने भारत सरकारकडे विदर्भातील सर्व नॅरोगेज शकुंतला रेल्वे तुमच्या असल्या, तरी त्या जागा आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा ठोकला. ती कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या जागेचा मोबदला म्हणून एक हजार ८६५ कोटी रुपये कंपनीला द्यावे, असा दावा आंतरराष्ट्रीय लवादाकडे सादर केल्याची माहिती अहे.
सरकारने दबावाला बळी पडू नयेखरे पाहता, २००३ मध्येच कराराची १०० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांचा करार संपला आहे. त्यामुळे आता त्या कंपनीची कोणतीच मालकी रेल्वे किवा साहित्यावर राहिली नाही. त्या जागा भारतात आहे. मात्र, सुंभ जळला; पण पीळ कायम' अशा चोराच्या उलट्या बोंबा कंपनी मारत आहे. मात्र, भारत सरकारने त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता तिन्ही शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून त्या सुरू कराव्या, अशी विदर्भात जनभावना आहे.