आष्टी (शहीद) : अप्पर वर्धा धरणाच्या काठावर बसलेल्या पिलापूर व येनाडा गावाला जाणाऱ्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या मार्गावरील डांबरच उखडले असल्याने वाहनचालकांसाह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आहे. डांबरीकरण उखडल्याने प्रवाशांना वाहनचालवितांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सरपंच संदीप देशमुख यांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन डांबरीकरणाची मागणी केली होती. परंतु, गत दोन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने समस्या अद्यापही कायम आहे. आष्टी ते मोर्शी मार्गावर आष्टीपासून १० कि़मी. अंतरावर येनाडा-पिलापूर फाटा आहे. या फाट्यापासून गावापर्यंत जाणाऱ्या ३ कि़मी.च्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. वाहन चालकांसह पायी जाणाऱ्यांनाही या मार्गाने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहनचालकांसह शेतकरी व ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी जातीने लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
पिलापूर रस्ता डांबरीकरणाची मागणी
By admin | Published: February 09, 2017 12:50 AM