लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : जिल्ह्यातील सीसीआय कापूस केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
हंगाम २०२४-२५ करिता आधारभूत दराने सीसीआयमार्फत कापसाची खरेदी ११ नोव्हेंबरपासून सुरु झाली. सीसीआयद्वारे सुरुवातीला जास्तीत जास्त ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सीसीआयने २३ डिसेंबरपासून कापसाच्या दरात बदल करून बीपी एसपीएल या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल या दराने कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सीसीआयद्वारे ६ जानेवारी २०२५ ला कापसाच्या दरात बदल करून एच४-एमओडी या ग्रेड अंतर्गत जास्तीत जास्त ७ हजार ४२१ प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी सुरू होती. परंतु, मध्यंतरी जिनिंगमधील जागेअभावी ३ ते ७फेब्रुवारी २०२५ पर्यंत कापसाची खरेदी बंद ठेवण्यात आली होती. अशातच १० फेब्रुवारी रोजी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. परंतु, तांत्रिक कारण देत आजपर्यंत खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सीसीआयची आधारभूत दराने कापूस खरेदी सुरू करण्याबाबत निवेदन दिले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठविले निवेदनहिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगारे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिश वडतकर, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप शिंदे व विलासराव मेघे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
२० लाख ६१ हजार क्विंटल कापसाची झालीय खरेदीहंगाम २०२४-२५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये १९ फेब्रुवारी ते आजपर्यंत २० लाख ६१ हजार ७८ क्विंटलएवढी कापसाची खरेदी झाली. त्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून १३ लाख ८३ हजार ३५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून केवळ ६ लाख ७८ हजार ४३ क्विंटल कापूस सीसीआयमार्फत खरेदी करण्यात आला आहे. खुल्या बाजारातील कापसाचे दर आधारभूत दरापेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. तसेच वाढत असलेले तापमान लक्षात घेता अधिक काळ शेतमाल घरी साठवणूक करून ठेवण्याची शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मोठ्या प्रमाणात आजही शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या उद्देशाने कापसाची विक्री केलेली नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सीसीआय कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.