सावंगी (मेघे) येथे एकाचा मृत्यू; दोघांवर उपचार : नरसापुरात आणखी चार रुग्ण आढळल्याने खळबळ वर्धा : जिल्ह्यांत गत महिनाभरापासून सुरू असलेल्या डेंग्यूने पुन्हा उद्रेक केला आहे. पहिले पुलागाव, हिंगणघाट येथे रुग्ण आढळून आले होते. यात तिघांचा मृत्यू याच रोगाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रतिबंध लागतो न लागतो तोच रविवारी आष्टी (शहीद) तालुक्यातील नरसापूर येथे डेंग्यूने एक दगावल्याने खळबळ माजली. सोमवारी सावंगी (मेघे) येथे पुन्हा याच रोगाने एकाचा मृत्यू झाल्याने या रोगाववर आळा बसविण्यात आरोग्य विभाग खुजा ठरत असल्याची चर्चा आहे. वर्धेतील समतानगर येथील एकावर सेवाग्राम तर दुसऱ्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. वर्धेलगतच्या ग्रा.पं. सावंगी (मेघे) परिसरात डेंग्यूच्या आजाराने एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचे नाव संजय बापूराव तुपसौंदर्य रा. समतानगर असे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर याच भागातील भारत गोटे यांना उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे. गौरव बडवाईक याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.जिल्ह्यात वाढत असलेल्या डेंग्यूच्या आजारावर आळा बसविण्याकरिता व त्याची कारणे शोधण्याकरिता पुणे येथील तज्ज्ञांची चमू जिल्ह्यात दाखल झाली होती. त्यांच्याकडून जिल्ह्यातील डास अळीसह रुग्णांचे रक्तनमुने नेण्यात आले. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झाला नाही. जिल्ह्यात एका पाठोपाठ एक गावात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग हतबल ठरत आहे. या आजारावर आळा बसविण्याकरिता जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभागाच्यावतीने विविध उपाययोजना सांगण्यात येत आहे; मात्र त्या निरुपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या आजारावर प्रतिबंध लावण्याकरिता या उपाययोजना कमी तर पडत नाही ना याचा अभ्यास करण्याची गरज आरोग्य विभागाला आहे. (प्रतिनिधी)जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तक्रार सावंगी (मेघे) ग्रा.पं. सदस्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करीत या परिस्थितीला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही सदस्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीकडे स्वत:च्या मालकीची फॉगींग मशीन असून ती माजी सरपंचाच्या घरी धूळ खात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या मशीनचा वापर करून गावात धुरळणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. माहितीनंतर आरोग्य विभागाकडून पाहणी डेंग्यूच्या संदर्भाने गांधी जयंतीदिनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांना येथील एका ग्रा.पं. सदस्याने दूरध्वनीवरून माहिती दिली. यावर सावंगी (मेघे) परिसरात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोनिका चारमोडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनतकरी यांच्या चमूने पाहणी केली. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम केले नसल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यावर डेंग्यूचे आक्रमण
By admin | Published: October 06, 2014 11:15 PM