रवींद्र चांदेकर, वर्धा :वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, मोर्शी आणि धामणगाव, या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात देवळी हा महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा, तर आर्वी हा महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा गृह मतदारसंघ आहेत. त्यामुळे हे दोन मतदारसंघ हॉट ठरणार आहेत. मोर्शी, हिंगणघाट, धामणगाव आणि वर्धा विधानसभा मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
गेल्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मोर्शी आणि हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य होते. धामणगाव आणि देवळी मतदारसंघात सर्वांत कमी मताधिक्य होते. २०१९ च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना ५ लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांना ३ लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यांच्यात एक लाख ८७ हजार १९१ मतांचा फरक होता. त्यावेळी मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला ४८ हजारांच्या वर, तर हिंगणघाट विधानसभेत ३८ हजारांच्या वर मताधिक्य मिळाले होते. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळी विधानसभेत त्यांना केवळ १६ हजार, तर धामणगाव विधानसभेत केवळ १८ हजारांवर मताधिक्य मिळाले होते.
मागील निवडणुकीत आर्वी विधानसभेत भाजप उमेदवाराला २६ हजारांवर आणि वर्धा विधानसभेत ३७ हजारांवर मताधिक्य होते. यावेळी आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक हॉट ठरणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार याच मतदारसंघातील आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दोन विधानसभा मतदारसंघांकडे राहणार आहे.
मागील निवडणुकीत आर्वीत महायुती आणि काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ २६, तर वर्धेत ३७ हजारांच्या वर मतांचा फरक होता. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा फरक कमी झाला होता, हे विशेष.मागील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये तर केवळ ७ हजार ९३३ मतांचा फरक होता. त्यामुळे यावेळी आर्वी, देवळीसह वर्धा विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहेत.
काँग्रेस आमदारांची प्रतिष्ठा पणाला-
महायुतीचे उमेदवार देवळी विधानसभा मतदारसंघातील आहेत. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ सामना होण्याचे संकेत आहेत. या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे आमदार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात कोण बाजी मारते, यावर पुढील विधानसभा निवडणूक अवलंबून असणार आहे.
४० ते ४९ वयोगटातील मतदार निर्णायक-
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत १० लाख ८९ हजार ७१८ मतदार आहेत. यात ४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक दोन लाख ४६ हजार ४४ मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटातील दोन लाख ३० हजार २०५ मतदार आहेत. त्या खालोखाल २० ते २९ वयोगटातील एक लाख ८८ हजार ७३२, तर ५० ते ५९ वयोगटातील एक लाख ८७ हजार आठ मतदार आहेत. हे सर्व मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. याशिवाय १८ ते १९ वयोगटातील १७ हजार ५०८ नवमतदार आहेत.