रामदास तडस : २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देवळी : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन बसस्थानक सुधारणा करण्याबाबत अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील बस स्थानक सर्व सोईयुक्त व सुसज्ज उभारण्याकरिता २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. तसेच अंदाजपत्रक प्राप्त होताच प्रशासकीय मंजुरी घेवून निविदा मागविण्याची कार्यवाही होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. गत अनेक वर्षांपासून देवळी येथील रापमचे बसस्थानक विकासाच्या प्रतीक्षेत होते. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावरून आवागमन करतात. सुविधाच्या अभावी प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशी व नागरिकांची समस्या लक्षात घेता खा. रामदास तडस यांनी देवळी बसस्थानकाचा कायापालट व्हावा, यासाठी शासनदरबारी वेळावेळी पाठपुरावा केला. त्यांनी सदर समस्या राज्याचे अर्थमंत्री व वर्धा तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडली. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकाराने देवळी बसस्थानकाकरिता २ कोटी ७६ लाखांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान करण्यात आली असून लवकरच निधीही उपलब्ध होणार असल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे. देवळी बसस्थानकाचे नुतनीकरण चांगल्या दर्जाचे व उच्च तंत्रज्ञानयुक्त होण्याकरिता पुणे येथील वास्तुविशारदाची नेमणूक राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आली आहे. सदर कार्यामध्ये प्रामुख्याने प्रतिक्षालय (आठ फलाट), वाहतूक नियंत्रण कक्ष, पार्सल कक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, खुली विहीर, वाहतनतळ, उपहार गृह, चालक-वाहक विश्रांतीगृह, बैठक सभागृह, अधिकारी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, पोलीस चौकी व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे या बाबीचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. प्रस्तावित बांधकामध्ये तळमजला व पहिला मजला असून दोन टप्प्यात कार्य पूर्ण होणार आहे. यामुळे प्रवाश्यांना मोठी सूविधा मिळणार आहे. लवकरच देवळी बसस्थान महाराष्ट्रातील आदर्श बसस्थानक होईल, असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला आहे. सदर बसस्थानकाच्या कायापालटासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. दिवाकर रावते यांचे आभार मानले आहे.(प्रतिनिधी)
देवळी बसस्थानकाचा होणार कायापालट
By admin | Published: January 07, 2017 12:50 AM