अतिक्रमणाचा वाद : कार्यालयाची तोडफोड; सीसीटीव्हीत आरोपी कैद देवळी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईला मंगळवारी गालबोट लागले. कारवाई दरम्यान बसस्थानक परिसरात संतप्त जमावाने न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख यांना मारहाण केली. तसेच पालिकेतील त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. हा सर्व घटनाक्रम कार्यालयातील सीसीटीव्हमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीमधील आरोपींची ओळखपरेड घेतली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, अतिक्रमणाच्या कारवाईची सूचना वर्तमानपत्रात व लाऊडस्पीकरच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना व दुकानदारांना पालिकेच्यावतीने देण्यात आली होती. यात दिवस आणि वेळेची माहितीही देण्यात आली होती. यानुसार आज सकाळी ९ वाजता न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात कारवाईला प्रारंभ झाला. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. सर्वप्रथम आठवडी बाजारातील अशोक कारोटकर यांच्या मालकीचे टुरींग टॉकीजचे बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर ही कारवाई टप्याटप्प्याने आठवडी बाजार चौक, गोडबोले चौक, न.प. माध्यमिक शाळा परिसर, इंदिरा गांधी चौक ते बसस्थानक चौकापर्यंत पोहचली. बसस्थानक चौकातील सार्वजनिक बांधकामच्या हद्दीतील गजानन पोटदुखे यांच्या हॉटेलचे अतिक्रमण काढल्यानंतर वादाला तोंड फुटले. दरम्यान आ. रणजित कांबळे घटनास्थळावर दाखल झाले. अतिक्रमण धारकांना नोटीस न देता ही कारवाई करण्यासंदर्भात त्यांची आक्षेप घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आक्षेप नसताना त्यांच्या हद्दीतील यवतमाळ रस्त्यावरील दुकाने कशी काय तोडण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेला हा अधिकार आहे काय, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार आ. कांबळे यांनी यावेळी केला. याचवेळी जमावातील काहींनी मुख्याधिकारी देशमुख यांना मारहाण केली. तसेच २५ ते ३९० जणांच्या जमावाने मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील टेबलावरील काचा, टेलिफोन, आलमारी व फर्निचरचे नुकसान करण्यात आले. या कारवाई दरम्यान अतिक्रमण धारकांना दुकानातील सामान काढण्याचीसुद्धा सवलत न दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. न. प. माध्यमिक शाळेजवळील अस्थायी स्वरूपात वसलेल्या ११ दुकानदारांचे यामध्ये लाखोचे नुकसान झाले. इंदिरा गांधी चौकातील दुकानदारांनी आपले अतिक्रमण आधीच काढून घेतल्याने त्यांचे नुकसान टळले. नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या सर्व घटनेची न.प. मुख्याधिकारी देशमुख यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपींवर ४५१, १४३, १४९, मुपोका १३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा ३ (१) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या निश्चित नसून ती ५० च्या आसपास असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.(प्रतिनिधी)
देवळी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाण
By admin | Published: March 01, 2017 12:49 AM