देवळी (वर्धा) : कोविड संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी देवळी येथील ऑक्सिजन प्रकल्प विदर्भासाठी दिलासा देणाराच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देवळी येथील प्राणवायू प्रकल्पाच्या आभासी उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कारखाना प्रशासनाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मानधनी, व्यवस्थापक सुरतराम दाखेरा, श्याम मुंदडा यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी म्हणून महालक्ष्मी स्टील उद्योगाने देवळीत शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे. तसेच सध्याच्या स्टील प्लांटला विस्तारीत करून सीएनजी सिलेंडरचे उत्पादन करून येथील युवकांच्या हाताला काम मिळवून द्यावे. वर्धा जिल्ह्यात सुसज्ज ऑक्सिजन प्लांटचे निर्माण करून महालक्ष्मी उद्योगाने जोपासलेली सामाजिक बांधिलकी ही कौतुकास्पद आहे. लघुउद्योग मंत्रालयाच्यावतीने स्टीलवर आधारित काही उद्योग देवळीत उभारून येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ना. गडकरी म्हणाले. ऑक्सिजन प्लांट अतिशय परीश्रमातून उभा राहिल्याचे मानधनी यांनी सांगितले. सात कोटी साठ लाख खर्चून हा प्रकल्प उभा राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले. देवळी येथील प्राणवायू प्रकल्पात सोमवारपर्यंत उत्पादित केलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची गाडी आ. रणजित कांबळे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर कोविड रुग्णालयाकडे रवाना करण्यात आली