वाहकांचा हिशेब नोटांवरच : विदु्रप नोटा बँकांतून येतात परत; सामान्य नागरिकांची गोची प्रशांत हेलोंडे वर्धा नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात आलेल्या नव्या नोटांवर काही लिहून विद्रुपीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात चर्चा झाली; पण त्याचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही. राज्य परिवहन विभागातील वाहक तिकिटांचा हिशेब लावताना हा निर्णय धाब्यावर बसवून थेट नोटांवरच लिहित असल्याने त्यांचे विद्रुपिकरण होत असल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांकडून विद्रुपिकरण झालेल्या नोटा नागरिकांच्या हाती येतात. ते नागरिक या नोटा बँकेत जमा करण्याकरिता गेले असता त्यांना बँकेकडून परत करण्यात येतात. यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसणे आलेच. यावर राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत वाहकांना नोटांवर लिहून त्याचे विद्रुपिकरण टाळण्याची ताकीत देण्याची गरज निर्माण झाली आहे. चलनी नोटांवर पेन, पेन्सीलने लिहिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात नोटांचे विद्रुपिकरण होत आहे. परिणामी, तेवढ्या रकमेचा तोटा रिझर्व्ह बँकेला पर्यायाने देशाला सोसावा लागतो. विद्रुप झालेल्या नोटा चलनातून बाद करण्याकरिता व त्या पुन्हा छापण्याकरिता पैसा खर्च करावा लागतो. हा तोटा टाळण्याकरिता रिझर्व्ह बँकेने नोटांचे विद्रुपिकरण करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. पेन, पेन्सील आदींनी लिहिलेल्या नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते. असे असले तरी या निर्देशांकडे बँकांसह नागरिक, नोकरदार यासह सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. परिणामी, नोटांच्या विद्रुपिकरणाचे सत्र थांबले नाही. १० ते १००० रुपयांच्या नोटांवर काही ना काही लिहिलेले आढळून येते. १० आणि ५० रुपयांच्या अनेक नोटांवर तर विविध चित्र काढल्याचेही आढळून आले आहे. नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज नव्याने बाजारात दाखल झालेल्या २००० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर कुठल्याही प्रकारचे लिखाण केलेले आढळल्यास त्या नोटा बँकांतून परत केल्या जात आहेत. नवीन नोटांवर कुणीही काहीही लिहिले तर त्या बँकेत घेतल्या जाणार नाहीत, या निर्णयाची आता आणखी कठोर अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे नोटांच्या विदु्रपिकरणाला चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २००० च्या नवीन नोटांवर पेन्सीलने लिहिलेले आढळले असता एका बँकेने ती नोट स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रकार शहरातच घडल्याने नागरिकांनी सावध होणे गरजेचे झाले आहे. वाहकांचा हिशेब बसमध्येच असतो ‘रेडी’ वाहक बसमध्येच आपले हिशेब ‘रेडी’ ठेवतात. हा हिशेब करताना ते नोटांवरच तो मांडतात. १० रुपयांच्या किती नोटा, ५० आणि १०० रुपयांच्या किती हे त्या नोटांवरच लिहितात. यातही वाहकांकडे पेन्सील नव्हे तर पेन असल्याने या नोटांचे विद्रूपिकरण आलेच. हा प्रकार टाळण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वाहकांनी तसेच प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात कर्मचारी व सामान्यांनी काळजी घेणेच गरजेचे झाले आहे.
एसटीमध्ये होते नोटांचे विद्रुपीकरण
By admin | Published: December 25, 2016 2:18 AM