वर्धा : दिवाळीच्या काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली आहेत. संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ व्यापली आहे. मात्र गावरान बोरांची मजा यात नाही.
गावरान बोरांचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते, अशी या गावरान बोरांची ख्याती प्राप्त आहे; पण काळाच्या ओघात ही बोरं लुप्त पावत चालली आहेत. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागासह शहरी भागातही फक्त गावरान पेवंदी व बारीक बोरच मिळत असे; पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण करण्यात आल्या खऱ्या पण यात गावरान बोरांची मजा बिल्कुलच नाही हे मात्र खरं.
पूर्वी बऱ्याच शेतात बोरं, आंबा,बाभूळ आदी झाडांचे बन मोठ्या प्रमाणात असायचे. शेतकऱ्यांकडून यांचे योग्य संगोपन केले जायचे; पण वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. यामध्ये गावरान बोरांचीही झाडे नष्ट करण्यात आली. तरी पण अनेक शेतकऱ्यांनी बोरांची झाडे जोपासली आहेत,यामुळे ग्रामीण भागात अजूनही गावरान बोरं चाखायला मिळतात,
१) *किलोला २५ रुपयांचा भाव*
एकेकाळी गावरान बोरांना काहीही किंमत नसायची मोठ्या प्रमाणात ही बोरं फेकली जायची. ग्रामीण भागातील मुलं बोरं गोळा करून ते वाळवत टाकून बोरकूट करायचे,पण आता तसे राहिले नाही.बोरांची झाडंही कमी झालीत आणि मुलंही व्यस्त झाली आहेत. यामुळे आज या बोरांचा भाव किलोला २५ रुपये झाला आहे,
२) यंदा ॲपल बोरही मिळेना
ही बोरं सफरचंदाच्या आकाराची असल्याने याला ॲपल बोर म्हटले जाते,याचे उत्पादन अधिकतर पंढरपूर भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते,पण यावर्षी परतीच्या पावसामुळे बोर पिकांचे मोठे नुकसान झाले, तसेच डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चही महागला यामुळे ॲपल बोर फार कमी प्रमाणात येईल.
३) शेतातून बोरांची झाडे गायब
माझ्या शेतात गावरान पेवंदी व बारीक बोरांची बरीच झाडे होती; पण दीर्घकालावधीमुळे ती जीर्ण झालीत व नष्ट झाली,तरी पण काही झाडे जोपासली आहेत, यामुळे आजही गावरान बोरं चाखायला मिळतात.
बाबा शेख, शेतकरी
वाढत्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी घरं बांधण्यात आली व बरीच पडीक जमीन वाहितीखाली आली यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आणि आता शेतात जी झाडे आहेत त्यामुळे माकडांचा त्रास उभ्या पिकांना होत आहे. यामुळे झाडं तोडणे सुरू आहे. बोरींच्या झाडासह इतरही झाडे नष्ट होत आहेत तरीपण आंब्याच्या व बोरांच्या झाडांचे जतन केले जाते.
राजेंद्र होरे, शेतकरी