लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पुलगाव रस्त्यावरील जय बजरंग जिनिंगच्या मागे असलेल्या शेत शिवारातील उभ्या पिकांची वन्य प्राण्यांकडून नासाडी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, महेश वामन तेलरांधे यांच्या शेतातील तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. तेलरांधे यांनी यंदा दहा एकरात कपासी व तुरीची लागवड केली. योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय तूर पिकाला शेंगाही लागल्या. शेंगा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा सदर शेतकऱ्याला असताना वन्य प्राण्यांनी उभ्या पिकांची नासाडी केल्याने शेतकऱ्याचे सुमारे ७० हजारांचे नुकसान झाले आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यातच वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकाची नासडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार होत असून त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. वन विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्षच करीत असल्याची परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ओरड होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी शासकीय मदत तटपुंजी असून नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीच्या बरोबरीने शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:59 PM
पुलगाव रस्त्यावरील जय बजरंग जिनिंगच्या मागे असलेल्या शेत शिवारातील उभ्या पिकांची वन्य प्राण्यांकडून नासाडी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : श्वापदांचा बंदोबस्त करण्याची मागणी