लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरीच सोयाबीनची साठवणूक केल्याचे दिसून येते. असे असले तरी सोयाबीनच्या दरात पाहिजे तशी वाढ होण्याची शक्यता नाही. सध्या सोयाबीनला मिळत असलेला सुमारे ३,३९९ रुपये हा दर रुपयाचे अवमूल्यन झाल्याने मिळत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.प्राप्त माहितीनुसार, सन २०१३ मध्ये अमेरिकेत सोयाबीनला प्रती बुशेल १४ डॉलरचा दर मिळाला होता. त्यावेळी भारतातही सोयाबीनला ३,२०० ते ३,३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. सध्यास्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला योग्य भाव मिळेल या प्रतीक्षेत घरात सोयाबीनची साठवणूक केली आहे. परंतु, भविष्यात सोयाबीनच्या भावात अतिशय जास्त वाढ होणार नसल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडे-थोडे सोयाबीन विक्री करण्यासाठी हाच कालावधी असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांना ३ हजार ६०० च्या घरात भाव मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतल्यास त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरणारे असल्याचे सांगण्यात येते.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ३,५०० पोते सोयाबीन तारणशेतमाल तारण योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमालाचा काटा होताच तात्काळ ७५ टक्के रक्कम दिली जाते.शेतमाल तारण योजना शेतकरी हितार्थ असल्याने वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये ती कार्यान्वीत करण्यात आली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या स्थितीत शेतमाल तारण योजनेंतर्गत सुमारे ३ हजार ५०० पोते सोयाबीन शेतकऱ्यांनी ठेवले असल्याचे सांगण्यात येते.निर्यातीची शक्यता धूसरचभाजप सरकारसह भाजपाच्या पदाधिकाºयांकडून सध्या यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन या शेतमालाची भारतातून निर्यात होईल, असे सांगितले जात आहे. परंतु, वास्तविक पाहता अमेरिकेत भाववाढीची शक्यता नाही. शिवाय, निर्यात संदर्भातील धोरण स्पष्ट नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.सोयाबीनला सध्या व्यापाऱ्यांकडून ३,२०० ते ३,२५० रुपये भाव दिला जात आहे. तर शासकीय खरेदी केंद्रावर ३ हजार ३९९ दर सोयाबीनला मिळत आहे. दोन्ही दरात जास्त तफावत नसली तरी भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. कापसाची आवक सुरू झाल्याने व त्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. सोयाबीनच्या भाववाढीची स्थिती सध्या नाही.- श्याम कार्लेकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.यावर्षी कमी पाऊस झाला. शिवाय सोयाबीन ऐन फुलावर आले तेव्हा परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे उत्पादनात घट आली. अशात सध्याचे दर न परवडणारेच आहेत. त्यामुळे थोडा भाव वाढला तर सोयाबीन विक्रीला काढण्याचा विचार आहे.- दिनकर काकडे, शेतकरी, आकोली.पावसाच्या लहरीपणाचा सोयाबीन पिकाला फटका बसला. शिवाय शेती जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागली. सोयाबीनला सध्या मिळत असलेले दर व पेरणी, खत, मजुरी असा उत्पादन खर्चचा हिशेब काढल्यावर ताळमेळच बसत नाही. अवघ्या ३ हजार २०० रुपयांमध्ये सोयाबीन विकण्यास न परवडणारेच आहे. सायाबीनचे दर किमान ३ हजार ६०० च्या घरात जाईल, अशी आशा आहे.- वसंत ठाकरे, शेतकरी, लादगड.उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे दुर्दैवच आहे. सोयाबीन पिकविण्यासाठी एकरी येणारा खर्च, पिकणारे सोयाबीन व बाजारात मिळणाऱ्या दराची सांगड घालून पहावी म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदना कळतील. भाववाढीची प्रतीक्षा आहे.- नरेश तेलंग, शेतकरी, सहेली.सोयाबीनच्या भावात खूप वाढ होईल अशी शक्यता सध्या नाही. सध्या सोयाबीनला मिळत असलेला भाव मोदी सरकारने दिलेला भाव नाही. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने भारतात सध्या सोयाबीनला सुमारे ३,३९९ प्रती क्विंटल दर मिळत आहे. सन २०१३ मध्ये अमेरीकेत सोयाबीनला प्रती बुशेल १४ डॉलर भाव होता. त्यावेळी भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ३,२०० ते ३,३०० रुपये भाव मिळाला होता. सध्या अमेरिकेत सोयाबीनला प्रती बुशेल ९ डॉलर भाव आहे. तेथे भाव वाढीची शक्यता नाही आणि निर्यातीचे चित्र नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी थोडे-थोडे सोयाबीन विकल्यास हरकत नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते.
अवमूल्यन; सोयाबीन ३,३९९ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:49 PM
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत घरीच सोयाबीनची साठवणूक केल्याचे दिसून येते. असे असले तरी सोयाबीनच्या दरात पाहिजे तशी वाढ होण्याची शक्यता नाही.
ठळक मुद्देकृषितज्ज्ञांनी व्यक्त केले मत : दरात वाढ होण्याची चिन्हे नाहीच