वर्धा : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच मानवाला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मानवी विकासात तंत्रविज्ञान व संचार माध्यमांचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन मानवी जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. म्हणूनच शिक्षण प्रक्रियेत विज्ञान, तंत्रज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शिक्षण पध्दतीतील कृती, अनुभवजन्यता, प्रयोगशीलतेतून शिकण्याची सहज प्रवृत्ती विकसित होण्याकरिता शालेय जीवनापासून याचा प्रारंभ झाला पाहिजे, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष सुगन बरंठ यांनी केले. सेवाग्राम येथील नई तालीम प्रेरित आनंद निकेतन येथे आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असलेल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. येथील बजाज सायन्स सेंटरच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे उद्घाटन सी.वाय. देशपांडे संचालक बजाज सायन्स सेंटर, जि.प. सदस्य सुनिता ढवळे, सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. उल्हास जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी देह मंदिर, चित्त मंदिर.. व धैर्य दे! हे गीत सादर केले. यानंतर बोलताना डॉ. जाजू यांनी विज्ञान आणि अध्यात्माची जोड आवश्यक असून नई तालीम याचे आदर्श आहे. आव्हान स्वीकारून नवीन विज्ञानाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. तसेच देशपांडे यांनी विज्ञान म्हणजे काय? पर्यावरण व शाश्वत विकासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी हेमंत मोहरीर, रवींद्र कडू, सुनील फरसोले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या जलसंग्रहण, पुनर्भरण, उपयोगिता व व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना या प्रतिकृतीची गरज स्पष्ट केली.यानंतर बोलताना मान्यवरांनी गांधीजींच्या बुनियादी शिक्षणाच्या तत्त्वावर शिक्षणाचे प्रयोगशील कार्य चालु आहे. गुणवत्ता, दर्जेदार व कृतीतून रचनावादी शिक्षणाची गरज व्यक्त केली. यावेळी गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, गांधी-विनोबा संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुषमा शर्मा यांनी केले. संचालन जया गावंडे यांनी केले तर आभार शीवचरण ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभाकर पुसदकर, गजानन अंबुलकर, योगीता गावंडे, जयश्री कामडे, शरद ताकसांडे, किशोर अमृतकर, उगले आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विकास शक्य
By admin | Published: February 27, 2015 12:06 AM