घोराड : तालुक्यात कोट्यवधींची कामे सुरू असतानाच एखाद्या पुलावरील भगदाड बुजविण्यास निधी नसावा, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. घोराड-कोलगाव या एक किमी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण सुरू आहे. याच रस्त्यावर येथून सव्वा किमी अंतरावर पुलाला मोठे भगदाड पडले आहे. ते भगदाड कुणालाही दिसले नसून जैसे थे आहे.या पुलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. या पुलावर असणारे भगदाड अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्याने बैलगाडीची सर्वाधिक वाहतूक होते. घोराड ते कोलगाव हा रस्ता समोर गायमुख, जुनगड, चौकी, कान्होलीबारा, हिंगणा, नागपूरपर्यंत जातो. दोन वर्षांपूर्वी या पुलाला पडलेले लहान छीद्र वर्दळीमुळे आता मोठे झाले आहे. एखाद्याचा जीव जाईपर्यंत शासन प्रतीक्षा करणार काय, की या पुलाची डागडुजी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले; पण ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने नव्याने बांधकाम करण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या पावसाळ्यात नाल्याच्या पुरामुळे हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलावरील भगदाडाची दुरूस्ती वा त्या पुलाची नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(घोराड)
कोट्यवधींच्या विकासात ‘त्या’ पुलावरील भगदाड दुर्लक्षित
By admin | Published: April 24, 2017 12:24 AM