खासदारांची माहिती : १४.८४ कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे वर्धा : केंद्र शासनाच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने आध्यात्मिक केंद्रे एकाच सर्किटद्वारे जोडण्याकरिता व यात्रेकरूंच्या सोईसुविधेकरिता ‘स्वदेश दर्शन’ योजना प्रारंभ केली आहे. या योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या गिरड येथील दरगाह तसेच विदर्भातील अष्टविनायापैकी एक असलेले केळझर देवस्थान या दोन्ही तिर्थक्षेत्राचा विकास ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतगृत करण्यात येणार आहे. याकरिता केंद्राशासनाकडे १४ कोटी ८४ लाख रुपयांचा प्रस्ताव प्रस्तावीत आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी शनिवारी दिली आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील वाकी, अदासा, धापेवाडा, पारडसिंगा, नारायणपूर, छोटा ताजबाग, गोरक्षण, तेंलगखेडी तसेच वर्धा जिल्ह्यातील गिरड व केळझर अशा एकूण १० धार्मिक आध्यात्मिक केंद्र एका सर्कीटद्वारे जोडली जाणार आहे. पर्यटनाला वाव व धार्मिक स्थळावर यात्रेकरूना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रमुख उद्देश ‘स्वदेश दर्शन’ योजनेचा आहे. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. येत्या आठवड्यात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांना वर्धा जिल्ह्यातील गिरड व केळझर या तीर्थक्षेत्राकरिता प्रस्तावित असलेल्या आराखड्याला मंजुरी मिळण्याबाबत विचारणा करणार असल्याचे खासदार तडस म्हणाले.(प्रतिनिधी)
‘स्वदेश दर्शन’अंतर्गत गिरड व केळझर तीर्थक्षेत्रांचा विकास
By admin | Published: July 24, 2016 12:15 AM