वर्धा : प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी, असा शासनाचाच आदेश आहे. मात्र आष्टी तालुक्यातील लहान आर्वी येथील स्मशानभूमीला वनहक्क कायदा अडचणीचा ठरला आहे. यामुळे विकासाचे कामच ठप्प झाल्याची बाब पुढे आली आहे.आष्टी तालुक्यातील लहान आर्वी येथील स्मशानभूमि व मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला. मात्र सदर जागा वनहक्क कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात आली नसल्याने येथील विकास कामे रखडली आहेत. वनहक्क कायदा कलम ३/२ अंतर्गत लहान आर्वी ग्रामपंचायतला ही जागा अधिग्रहीत करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील लहान आर्वी येथील विकासकामाकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदाराने २००९ मध्ये स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी निधी दिला होता. परंतु स्मशानभूमीचे काम सुरू झाल्यावर वनविभागाने यावर बंदीचे आदेश दिले. शिवाय तत्कालीन सरपंच यांनी निधी मिळविण्याकरिता कागदपत्राचा पाठपुरावा न केल्यामुळे तो निधी शासनाला परत गेला. याशिवाय वनहक्क कायद्याच्या पेचात गावातील काही विकासकामे खोळंबली आहे. यामुळे स्मशानभूमीचे विकासकाम अर्धवट राहिले. गावाकरिता विकास निधी प्राप्त होण्यासाठी वन मंत्रालयाने तातडीने जमीन अधिग्रहणाचा हक्क देण्याची मागणी सरपंच सुनील साबळे यांनी शासनाकडे केली आहे. शासनाच्या निर्णयाची येथील ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. येथील मंदिर व स्मशानभूमि हा परिसराल नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. याचा विकास करण्याची मागणी होत आहे. स्मशानभूमीसह भवानी मातेच्या मंदिराचा भविष्यात जीर्णोद्धार करायचा असल्यास शासकीय निधी मिळविण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वनहक्क कायद्यात अडकला स्मशानभूमीचा विकास
By admin | Published: December 27, 2014 2:19 AM