लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शुक्रवारी अनेक भाविक विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. ‘नको सोन्या-चांदीचे दान; फक्त भिजव तहानलेले रान’ असे म्हणत जिल्ह्यातून दुष्काळाला हद्दपार कर माऊली असेच साकडेच भाविकांनी विठ्ठल चरणी घातले.मागील काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अंकुरलेले पीकही माना टाकत आहेत. शिवाय दमदार पावसाअभावी जलाशयातही ठणठणाट आहे. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागले आहे. अशातच जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनीही तूर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांची लागवड केली. जमिनीत ओलावा कायम राहिल्याने बियाणेही अंकुरले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊसच बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास पाणीबाणीच उद््भवेल. पाणीबाणीसह कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी वरुणराजाला वर्धा जिल्ह्यात बरसण्याची आज्ञा दे असे साकडेच शुक्रवारी भाविकांनी विठ्ठलाला घातले. वर्धा शहरातील मालगुजारीपूरा भागातील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरात शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
५१ फूट उंच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळीआभाळागत माया, तुझी आम्हावर राहू दे... सुख, समृद्धीचा पाट, साऱ्या विश्वामध्ये वाहू दे... अशी मनोमन प्रार्थना विठ्ठला चरणी करीत येथील वणेच्या तिरावर ५१ फुट उंच विठ्ठल मूर्तीचे दर्शन करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आषाढी एकादशीचे औचित्य साधून वणा नदीच्या पैलतिरावर असंख्य भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. जवळपास ५ फूट वणेच्या पात्रातून चालत जात महिला, पुरुष भाविकांनी पैलतिर गाठला. माऊलीच्या दर्शनाने अवघे दु:ख दूर झाल्याची भावनाच यावेळी भक्त व्यक्त करीत होते. टाळ, मृदंगाच्या निनादात भक्तीरंगात रंगलेल्या भाविकांनी जय जय रामकृष्ण हरी आणि ज्ञानबा तुकाराम नामाचा जयघोष केला. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी रामाजी फाले, नगरसेवक धनंजय बकाने, प्रमोद गोहणे, राजू सेनाड, प्रवीण बोकडे, सुरेश वाटकर, भेंडे, आशीष इरखेडे आदींची उपस्थिती होती.
प्रतिपंढरीत फुलला भाविकांचा मेळा आषाढी एकादर्शीच्या निमित्ताने प्रतिपंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथे भाविकांचा मेळाच फुलला होता. येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच एकच गर्दी केली होती. एकादर्शीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले.
भक्तिसागरात विद्यार्थीही तल्लीनवर्धा शहरातील केळकरवाडी भागातील सरस्वती विद्या मंदिरम् येथील विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. विठ्ठल नामाचा जयघोष करीत अनवाणी पायानेच विद्यार्र्थी या दिंडीत सहभागी झाले होते. पालखी पुजन परसोडकर यांनी केले. यावेळी देशपांडे, पांडे, जलताडे, वाघ, शेंडे, ढुमणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या दिंडीत विद्यार्थी कुर्ता-पायजामा तर विद्यार्थिनी नववारी परिधानकरून सहभागी झाले होते, हे विशेष.