वर्धा : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश आहे. त्यातील धाम नदीच्या संवाद यात्रेस सोमवारी नदीचा उगम स्थळ असलेल्या कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून सुरुवात झाली. धाम नदीकाठावरील तब्बल ४५ गावांची परिक्रमा पूर्ण होत या यात्रेचा समाराेप समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे ८ मे रोजीला होणार आहे.
धाम नदी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच शरद भड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, कारंजाचे सहा. गटविकास अधिकारी मंगेश पंधरे, नदी समन्वयक सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे, भाऊसाहेब थुटे, माजी जिल्हा परिषद सभापती गोपाळ कालोकर, उमाकांत तायवाडे आदींची उपस्थिती होती. धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या गायमुख व धामकुंड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जैवविविधता, जलस्त्रोत, प्राणी, पक्षी, नदीची स्थिती आदींची गावकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात नद्या स्वच्छ, सुंदर व अमृतवाहिनी होण्यासाठी गावकऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मंगेश वरकड यांनी सांगितले.
लोक सहभाग शिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले. ज्याला ज्याला पिण्यासाठी पाणी पाहिजे आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने या अभियानात सहभागी होणे आवश्यक असल्याचे किर्तनकार भाऊसाहेब थुटे यांनी सांगितले. याप्रसंगी मुरलीधर बेलखोडे व सुनील रहाणे यांनीही मनोगतातून अभियानाचे महत्त्व पटवून दिले.सरपंचांनी दाखविली हिरवी झेंडी
धाम नदी संवाद यात्रेची सुरूवात सरपंच शरद भड यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. या यात्रेत मंगेश पंधरे, मंडळ अधिकारी सिद्धार्थ लभाने, वनरक्षक शफी पठाण, ग्रामसेवक नामदेव ढोबाळे, तलाठी मंजूषा दाळवणकर, युवा स्वयंसेवक काजल रोकडे, अजय रोकडे, शेजल पोहणकर, विजय अढाव यांच्यासह मोठ्या संख्येने निसर्ग व नदी प्रेमी सहभागी झाले आहेत.