वन मिनिट गेम शोचा आनंद लुटला ‘दुहेरी’च्या कलाकारांनी...वर्धा : लोकमत सखी मंच व स्टार प्रवाहच्यावतीने २० जून रोजी मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात ‘दुहेरी’ मालिकेच्या कलाकारांसह खास सखी मंचच्या सदस्यांसाठी दिलखुलास धम्माल व वन मिनीट गेम शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखींनी कलाकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि वन मिनीट गेम शोचा आनंद लुटला.वन मिनीट गेम शोमध्ये अनेक मजेदार गेम खेळविण्यात आले, ज्यात सखी मंच व दुहेरीचे कलाकार हरवून गेले. बघता बघता कार्यक्रमाची रंगत एवढी वाढली की कार्यक्रमाला आलेले सखीचे यजमानसुध्दा स्वत:ला रोखू शकले नाही व त्यांनीसुध्दा वन मिनीट गेम शोमध्ये सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलनाने झाली. दीप प्रज्वलन पोलीस विभागाच्या महिला सुरक्ष पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, समाजसेविका पुष्पा डायगव्हाने, यांनी केले. त्यानंतर ‘दुहेरी’ मालिकेचा ४५ मिनिटांचा एक विशेष भाग दाखविण्यात आला. त्यानंतर लगेच दुहेरी मालिकेचे कलाकार सुनील तावडे ज्यांनी परसु नावाची एक आगळ्या-वेगळ्या खलनायकाची भूमिका पार पाडली आहे व अमृता पवार पात्राचे नाव नेहा हिने मैथिलीच्या छोट्या बहिणीची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी ‘दुहेरी’ मालिकेबद्दल सविस्तर कथा व अनुभव आणि सेटवरील गमती-जमती सखींसोबत शेअर केल्या. वन मिनीट गेम शो मध्ये एकापेक्षा एक गेम घेण्यात आले. त्यात शिल्पा कुपटेकर ही सखी विजेती ठरली. तिला अमृता पवार (नेहा) हिच्या हस्ते पैठणी देण्यात आली. तसेच उपस्थित सखींसाठी सुध्दा कलाकृतीतर्फे लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वंदना टेकाडे या भाग्यवान सखीला सुनील तावडे यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. कलावंतांचे स्वागत वर्धा लोकमतचे ब्रांच मॅनेजर उमेश शर्मा व वर्धा लोकमतचे संपादक राजेश भोजेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अमोल शेंडे यांनी केले. (उपक्रम प्रतिनिधी)
स्टार प्रवाहवरील ‘दुहेरी’च्या कलावंतांची सखींसोबत धम्माल
By admin | Published: June 26, 2016 2:07 AM