लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एकेकाळी घरी लग्नकार्य म्हटले की, महिना-दोन महिन्यांपासून लग्नाची तयारी केली जायची. किमान एक महिना अगोदर लग्नपत्रिका छापल्या जायच्या. पाहुण्यांच्या गावोगावी जाऊन त्या वाटल्या जायच्या. मागील काही वर्षात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लग्नपत्रिकाही मागे पडू लागल्या आहेत. आता घरी एखादी लग्रपत्रिका शोधूनही सापडत नाही. भविष्यात या लग्नपत्रिका इतिहास जमा तर होणार नाहीत ना? असा प्रश्न वयस्करमंडळी व्यक्त करीत आहेत.
दोन-चार वर्षांपूर्वी लग्नसराईच्या दिवसात घरी पत्रिकांचा खच साचायचा. घरी शंभर ते दीडशे पत्रिका यायच्या. या लग्नाची तारीख चुकू नयेत म्हणून नागरिक तारखेनुसार लग्नपत्रिका लावून सांभाळून ठेवायचे. वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या आकर्षक पत्रिका छापण्यावर भर असायचा. त्यामुळे पत्रिकावरूनही परिवाराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला जायचा. त्यामुळे पत्रिकावरून परिसरात चर्चाही रंगायची. विवाहापूर्वी दीड ते दोन महिन्यांपासून पत्रिका वाटपचा कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यासाठी वधू-वराकडील मंडळींची चांगलीच दमछाक व्हायची. यामुळे पत्रिका छपाईतून अनेकांना रोजगारही मिळायचा. पत्रिकांसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. पण, आता पत्रिकांची क्रेझ कमी झाली आहे. अशातच दोन वर्षांपासून कोरोना प्रकोपाने लग्नावर बंधने आलीत. त्यामुळे विवाहाचा धुमधडाकाच थांबला आहे. ना वरात, ना बँडबाजा, गुपचूप विवाह उरकले जात असल्याने आता मोजक्याच व्यक्तींना व्हॉट्स-अॅपवर पत्रिका पाठवल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांचा त्रास वाचला असला, तरीही बेरोजगारीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्याकाळी वार्तालापाचे कुठलेही साधन नसल्याने लग्नपत्रिका छापल्याशिवाय पर्याय नव्हता. लग्नपत्रिका छापताना भावबंधकीचे नाव टाकताना मोठी कसरत करावी लागत. अनेकदा एखादे नाव विसरले तर ते कुटुंब नाराज व्हायचे. त्यांच्या परिवारातील सदस्यही लग्नाला येत नसत. तसेच लग्नपत्रिका वाटतानाही मोठा त्रास सहन करावा लागत असे. बदलत्या काळात सोशल मीडियाची पद्धत बरी वाटत असली, तरी यात पूर्वीप्रमाणे जिव्हाळा राहिला नाही.
रमेश भोयर, ज्येष्ठ व्यापारी, समुद्रपूर
लग्नपत्रिका छपाईचे काम दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाचे निमित्त असले, तरी लोकांचा पत्रिका छपाईकडे असलेला कल कमी होत आहे. या संपूर्ण वर्षात माझ्याकडे केवळ दहा ते पंधरा लोकांनी लग्नपत्रिका छापून घेतल्या. त्याही देवाजवळ ठेवण्यासाठीच. त्यामुळे रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पराग मुंगल, संचालक, प्रिंटिंग प्रेस, समुद्रपूर