दिंडीचे १३ वे वर्ष : तरूण ते वयोवृद्धांचा समावेश, वारीत सहभागी भाविकांचे गावात स्वागतलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : ‘ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, पांडुरंग पांडुरंग’च्या जयघोषात बोरतिर्थावरून संत केजाजी महाराज दिंडी बुधवारी सायंकाळी आळींदीकडे रवाना झाली. या दिंडीचे हे १३ वे वर्ष आहे. गुरूवारी सकाळी विठ्ठल-रूख्माई मंदिरात महाआरतीनंतर पताका भवानी मंदिरात ठेवण्यात आली. सायंकाळी ५ वाजता भवानी मंदिरातून गावाच्या सिमेपर्यंत टाळ मृदंगाच्या निनादात भजनी मंडळाचा समावेश असलेली दिंडी निघाली. विणेकरी व पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे जागोजागी लाकडी विणेकरी पाटावर पाय धुतले जात होते. कुंकवाचा टिळा लावला जात होता. हातात आरतीचे ताट घेऊन ओवाळले जात होते. हा सोहळा पाहून जणू पंढरीत असल्याचा भास होत होता. पंढरपूला जाणाऱ्या वारकऱ्यांना गावाच्या सिमेंपर्यंत सोडण्यास मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा सहभाग होता. येथून ही दिंडी ट्रकने आळंदीपर्यंत प्रवास करून माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. या दिंडीचे विणेकरी बबनराव माहुरे आहेत. आजही वयाच्या ७९ व्या वर्षी स्फूर्तीने सर्वांना सोबत घेवून विठ्ठलाच्या भेटीची आस कायम ठेवली आहे. पेशाने शिक्षक असतानाही त्यांनी पंढरपूरची वारी सुरू केली; पण मागील बारा वर्षांपासून ते या दिंडीचे विणेकरी आहेत. या दिंडीचे चालक नरेश महाराज पाटील असून या दिंडीत आळंदीवरून दीड हजारांहून अधिक वारकरी सहभागी होत आहेत. घोराड येथील कृपाशंकर खोब्रागडे १९६८ पासून नित्यनेमाने पंढरपूरची वारी करीत आहेत. प्रतिपंढरपूर घोराड येथील असंख्य भाविक आषाढी एकादशीच्या पंढरपुरातील सोहळ्यात सहभागी होत आहेत. वारकरी दिंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावात भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती. वारीत सहभागी भाविकांचे गावातही जागोजागी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनीही गावाच्या सिमेपर्यंत वारीमध्ये सहभाग घेतला.
ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दिंडी आळंदीकडे
By admin | Published: June 16, 2017 1:26 AM