तीन टक्के निधीसाठी आंदोलन : प्रहार अपंग क्रांती संघटनेचा एल्गार वर्धा : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नोंदणीकृत १७२ दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या पालिका प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास न. प. मुख्याधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली; पण तोडगा न निघाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. अखेर सायंकाळी ६ वाजता अपंगांचा राखीव तीन टक्के निधी १५ दिवसांत खात्यांत जमा केला जाईल. नोंदणी पूर्ण केली जाईल व गाळ्यांमध्ये अपंगांना तीन टक्के आरक्षण दिले जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. वर्धा नगर पालिका कार्यक्षेत्रात सुमारे १७२ दिव्यांग असल्याची नोंद आहे. ३ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना तो २०११ पासून खर्च करण्यात आला नाही. सदर ३ टक्के निधी त्वरित खर्च करावा. वर्धा न.प. हद्दीतील सर्व दिव्यांगांची नोंद घ्यावी. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी २०० चौरस फुट जागा उपलब्ध करून द्यावी. दिव्यांगांना मालमत्ता करात सुट देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाव्या म्हणून पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली; पण पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. आंदोलनादरम्यान शिष्टमंडळासोबत न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली; पण कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. यात प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेचे विदर्भ प्रमुख हनुमंत झोटींग, प्रमोद कुराटकर, विकास दांडगे, नितेश चातुरकर, स्रेहल खोडे, विठ्ठल नेहारे, लता मिठे यासह महिला-पुरुष दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) जि.प.मध्ये लेखा कर्मचाऱ्यांचे कामबंद राज्यातील जि.प. मधील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून काळी फित लावून निषेध आंदोलन केले; पण तोडगा न निघाल्याने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ वर्षांपासून न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला. यानंतर शासकीय स्तरावर मागण्या निकाली निघाव्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मार्च महिन्यातील जिल्हा परिषदेचे वित्तीय व्यवहार ठप्प झाले आहेत. संपूर्ण राज्यात आंदोलन असल्याने सर्वच जि.प. चे कामकाज ठप्प झाले आहे.
पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या
By admin | Published: March 16, 2017 12:38 AM