१३ सभासदांच्या स्वाक्षऱ्या : जिल्हाधिकारी व उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादरवर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांच्यावर सोमवारी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपनिबंधक ए.बी. कडू यांना सादर करण्यात आला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या एकूण १३ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तत्पूर्वी आमदार रणजित कांबळे व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी अविश्वास प्रस्तावावर शिक्कोमोर्तब केले. चार महिन्यांपूर्वी वर्धा बाजार समितीचे सभापती शरद देशमुख यांच्यावर कलम १४ अंतर्गत कार्यवाहीचा ठराव सादर केला होता. यावेळी त्यांनी सभासद पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झाले होते. यामुळे सदर पदाकरिता निवडणूक झाली. सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्याने सहकार नेते व माजी आमदार सुरश देशमुख यांनी पक्षाचा व्हीप काढत सभापतिपद रमेश खंडागळे यांना देण्याचा निर्णय दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे श्याम कार्लेकर यांनी बंडखोरी करीत सभापतिपदाकरिता दाखल केलेला अर्ज परत घेतला नाही. यात ते विजयी झाले. यावेळी झालेल्या मतदानामुळै काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गट आपण एकनिष्ठ असल्याचा दावा करीत होते. या पार्श्वभूमीवर खरे काय ते समोर यावे, याकरिता अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मिळून एकूण १३ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बंडखोरी करुन मिळविलेले सभापतीपद कार्लेकर टिकवू शकतात वा नाही याकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
वर्धा बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास ठराव
By admin | Published: September 13, 2016 1:05 AM