वर्धा : उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी वर्धा शहरात मात्र सर्वत्र उघड्यावर अन्न पदार्थांची जोरात विक्री केली जात आहे़ याठिकाणी वापरात असलेले पाणीही तितकेसे शुद्ध नसते. या पार्श्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थांची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे़ असे असले अन्न व औषध प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. खाद्य पदार्थाची विकी करताना अनेक नियम पाळावे लागतात़ ज्या ठिकाणी स्टॉल आहे तेथे सांडपाणी वाहून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे़ मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी या नियमाला बगल दिली आहे़ अनेक स्टॉल घाणीच्या जवळपासच असल्याचे दिसते. ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे़ मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठरावीक हॉटेलमध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले़ सोबतच हे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाणीही अशुद्ध असते. खाद्य पदार्थावर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे़ परंतु बसस्थानक, कचेरी परिसर तसेच इतरही मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात़ रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थावर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते़ त्यामुळे हे पदार्थ दूषित होतात़ त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते़ असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहे़ याविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. सध्या शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. अशावेळी असे उघड्यावरील पदार्थ खाणे आणि तेथील पाणी पिणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. पण बाहेरील पदार्थ थोडेफार स्वस्त मिळत असल्याने नागरिक असे पदार्थ खाण्यावर जास्त भर देतात. कचेरी आणि बसस्थानक परिसरात हा प्रकार जास्त दिसतो. उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे आणि तेथील पाण्यामुळे पोटाचे आणि संसर्गजन्य आजार बळावू लागल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(शहर प्रतिनिधी)
उघड्यावरील खाद्यपदार्थ व पाण्यामुळे आजार
By admin | Published: October 06, 2014 11:18 PM