कर्मचाऱ्यांची कमतरता : पासेसकरिता विद्यार्थ्यांची होते अडचण, उन्हातच लागतात रांगासेलू : तालुका स्थळ व नगर पंचायत असलेल्या सेलू शहरातील बसस्थानक असुविधांचे आगार झाले आहे. कर्मचाऱ्यांचा अभाव, पासेसेसाठी विद्यार्थ्यांच्या उन्हातच रांगा व स्वच्छतेचा अभाव यामुळे विद्यार्थी, प्रवासी त्रस्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.सेलू शहर व तालुक्यातील सर्वच गावांतून शिक्षण घेण्यासाठी हजाराच्या वर विद्यार्थी दररोज बसने वर्धेला जातात. त्यांची पास मिळण्याचे एकमेव ठिकाण सेलू बसस्थानक आहे. नियंत्रण कक्षातील एकाच कर्मचाऱ्यावर बसस्थानकात येणाऱ्या बसेसच्या आवागमणाच नोंद करणे, विद्यार्थ्यांना पासेस देणे ही जबाबदारी आहे. यामुळे पासेससाठी विद्यार्थ्यांना लांब रांगा लावाव्या लागतात. रांगेत लागणाऱ्या विद्यार्थ्याला सुमारे अर्धा-एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. उन्हात या विद्यार्थ्यांना खिडकीसमोर उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. या बसस्थानकावर पंखे नाहीत. प्रवाशांना बसण्यासाठी असणाऱ्या आसण व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. याकडे आगार प्रमुखाचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाची स्वच्छता वाऱ्यावर असून सफाई कामगार नाही. बसस्थानकाच्या मागील बाजूने झाडे-झुडपे वाढली आहे. नव्याने बांधलेल्या शौचालयाचे कुलूप उद्घाटनाची प्रतीक्षा असल्याने उघडले नाही. बसस्थानकाच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे विद्यार्थी, प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या बसस्थानकावर पासेस देण्याकरिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात यावी. बसस्थानक परिसरातील असुविधा दूर कराव्या, अशी मागणी करण्यात आली. याबाबत वर्धा आगार प्रमुखांना सेलू तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद गोमासे, स्वप्नील माहुरे, विवेक धोंगडे, मयूर चोरे, दिनेश कामीनकर यांनी निवेदन सादर केले.(शहर प्रतिनिधी)
सेलू बस स्थानक झाले असुविधांचे आगार
By admin | Published: September 07, 2016 1:04 AM