वर्धा : वॉर्डातील कामांच्या टेंडरवरून दोन माजी नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद झाल्याने दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये चांगलीच फ्री स्टाइल हाणामारी नगरपालिकेच्या आवारात सायंकाळी ५.२५ वाजताच्या सुमारास झाली. या घटनेत वॉर्ड क्रमांक १९ मधील माजी नगरसेवक परवेज खान आणि न.प.चे कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक जखमी झाले. या घटनेची माहिती नगरपालिका प्रशासनाने पोलिसांना दिली असता, पोलिसांनी तत्काळ नगरपालिकेत धाव घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
माजी नगरसेवक परवेज खान यांच्या वॉर्ड १९ मध्ये कंत्राटदार रामू लष्कर यांच्याकडून कामे सुरू आहे. कंत्राटदार रामू लष्कर हा माजी नगरसेवक शेख सलीम उर्फ सल्लू यांच्या गटाचा आहे. परवेज गट आणि शेख सलीम या दोन्ही गटांत कामांच्या टेंडवरून वाद सुरू आहे. यासंदर्भात दोन्ही गटातील पदाधिकारी न. प. मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासोबत याबाबत चर्चा केली होती. दरम्यान, मुख्याधिकारी भगत यांनी लिखित स्वरूपात तक्रारी द्या, नियमानुसार न. प. कडून कारवाई केल्या जाईल, असे सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर शेख सलीम उर्फ सल्लू याच्या गटातील कंत्राटदार रामू लष्कर न.प. च्या आवारातून बाहेर जात असतानाच माजी नगरसेवक परवेज खान तेथे आला आणि दोघांत चांगलाच वादंग झाला. दोन्ही गटांत चांगलीच हाणामारी झाली. ही हाणामारी थांबविण्यासाठी न. प. कर्मचारी आणि सुरक्षारक्षक मध्यस्थी गेले असता, तेही जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ न. प. कार्यालयात पोहोचून प्रकरण शांत केले.
पोलिसांच्या मध्यस्तीनंतर प्रकरण शांत
टेंडरच्या कारणातून न. प. परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीमुळे न. प. मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी न. प. परिसर गाठून दोन्ही गटांतील समर्थकांना शांत केले. यावेळी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
खुर्च्यांची केली तोडफोड
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर माजी नगरसेवक असलेल्या दोन्ही गटातील समर्थकांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दालनासमोरच दोन्ही माजी नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. या राड्यात एक माजी नगरसेवक जखमही झाले. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड करून न. प. चे नुकसान केले.
टेंडरच्या कारणावरून दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांसोबत त्यांना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. दोघांनाही लिखित स्वरूपात तक्रार मागून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही सांगितले. मात्र, काही वेळातच मारहाण होत असल्याचा आवाज ऐकू आल्यावर तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
राजेश भगत, मुख्याधिकारी, न. प. वर्धा.