कर्मचाऱ्यांचा अभाव : भाडोत्रींवर चालतो कारभारअल्लीपूर : महावितरणचे ग्रामीण भागातील मोठे कार्यालय येथे आहे़ कवडघाट ते अल्लीपूर व अल्लीपूर ते मनसावळीपर्यंतच्या सर्व ३० ते ४० गावांचा कारभार चालविला आहे़ यात ५ हजार विद्युत ग्राहक असून कोट्यवधींचे उत्पन्न आहे़ असे असले तरी सेवेच्या नावावर मात्र बोंबच आहे़ यामुळे महावितरण ग्राहकांसाठी ‘मरण’वितरण ठरू पाहत आहे़कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्राहकांना वितरणला झटका बसत आहे़ शाखा अभियंता कार्यालयात विजेची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी हाताशी घेतले जातात़ त्यांना स्वत:च मजुरी देत कार्यालय व लाईनचे मेंटनन्स व अर्जंट कामे करून घेतली जातात़ हे करीत असताना अभियंत्याचीच तारांबळ उडते तर सामान्य जनतेच्या तक्रारी कशा सोडविणार, हा प्रश्नच आहे़ अनेक गावातील खांब वाकले़ काही शेतात तारा पडून आहे़ अनेक शेतकऱ्यांचे पंप विजेअभावी बंद आहे. कार्यालयात ३ ते ४ कर्मचारी आहेत़ ते कधी येतात व जातात, याचा पत्ता नसतो. केवळ सही करणे व पानटपऱ्या राखणे एवढेच काम ते करीत असल्याचे दिसते़ आहे ते कर्मचारी खांबावर चढू शकतील, असे नाहीत़ वयोवृद्ध असल्याने तक्रारींची पूर्तता होत नाही. नाईलाज म्हणून खासगी लाईनमनकडून कामे करून घ्यावी लागतात़ तक्रारींचे निवाराण होत नसल्याने कुणी ग्राहकही कार्यालयात जात नाही़ पाणी येत नसल्याने पिके वाचविण्यासाठी ठिंबक, स्प्रिंकलर लावण्याची घाई आहे; पण विद्युत तारा जमिनीवर लोळण घेत असल्याने ओलित कसे करणार, हा प्रश्नच आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)
महावितरण ठरतेय ग्राहकांसाठी ‘मरण’ वितरण
By admin | Published: June 25, 2014 12:36 AM