लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील ३३ हजार ५०० नागरिकांना तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचे घरपोच वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेक वित्तसंस्था आपल्या अस्तित्वासाठी झगडत होते. तसेच या वित्तसंस्था व बॅंकांना व्यवसाय विस्तार कसा होणार हा यक्षप्राश्न बॅंकांपुढे पडला होता. या परिस्थितीतही पोस्ट पेमेंट्स बॅंकेची ही कामगिरी प्रशंसेला पात्र ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणावर बॅंक खाती उघडण्यात आल्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक आता आधार संलग्न असलेल्या कोणत्याही बॅंक खात्यासाठी आंतरबॅंक सेवा पुरवणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणून उदयाला येत आहे. घरपोच रोकड नेण्यासाठी जिल्ह्यातील २८० पोस्टमन राबत आहे. यासाठी जिल्ह्यातील १५६ पोस्ट कार्यालये कामाला लागली आहेत.
घरपोच रोकड पोहचविताना पोस्टमन बोटांच्या ठशांवरुन संबंधित ग्राहकांची ओळख पटवून घेतली. तसेच कंटेन्मेंट झोन, स्थलांतरितांचे कॅम्प, हॉटस्पॉट, आजारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना त्यांची रोकड आधार आधारित पेमेंट सेवेमार्फत दिल्या गेली. लॉकडाऊन काळात एकीकडे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना पोस्टबॅंकेद्वारा पोस्टमनच्या मदतीने नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचवून दिल्याचे काम केल्याने कोरोना काळात पोस्टमन यांनी कोरोना योद्धांचे कार्य केले.
पाच हजार विद्यार्थ्यांनी उघडली खाती
कोरोना काळात सर्वच व्यवहार बंद होते. बॅंका देखील बंद होत्या. अनेक विद्यार्थ्यांंना आपले खाते उडायचे होते. अशातच पोस्ट बॅंकेद्वारा नागरिकांच्या घरोघरी जात रोकड पोहचविण्याचे काम केले असून या संकट काळात ५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली आहे.
औषधांसह राख्याही पोचता केल्या घरपोच
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित झाले होते. सर्वत्र जिल्हाबंदी होती. अशातच राखीसण आल्याने अनेक बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता आली नाही. तसेच कोरोना काळ सुरु असल्याने कुणी यायलाही तयार नव्हते. अशावेळी अनेकांनी राख्या या पोस्टाने पाठविल्या. या संकट काळातही पोस्टमनने घरोघरी जात राख्या पोहचवून दिल्या. तसेच अनेकांनी औषधी देखील पोस्टाद्वारो पाठविली होती. ती सुद्धा नियोजित स्थळी पोहचवून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कोरोना काळात पोस्टमन हे खरे कोरोना योद्धा ठरल्याचे एकंदरित पहावयास मिळते.
कोरोना काळात पोस्टबॅंकेद्वारा जिल्ह्यातील २८० पोस्टमनद्वारा ३३ हजार ५०० नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना घरपोच रोकड नेऊन देत सेवा दिली तसेच राखी सणानिमित्त राखी, आणि औषधांचीही पाेेस्टमन यांनी घरपोच सेवा दिली.
अविनाश अवचट
पोस्टमास्टर, मुख्य डाकघर