निवेदन सादर : शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित - कुणावारवर्धा : कारंजा तालुक्यातील मासोद, लादगड येथील शेतकऱ्यांची कर्ज पुनर्गठणाची समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासोबत चर्चा केली. गुरूवारी झालेल्या या चर्चेनंतर नवाल यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आ. समीर कुणावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, जिल्हा उपाध्यक्ष निलेश किटे, शहराध्यक्ष आकाश चौधरी, प्रदीप ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी निवेदन देवून समस्यांशी अवगत करुन दिले. कर्जाच्या पुर्नगठणासाठी संबंधीत बॅँकेकडे गेल्यावर बॅँकेचे अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. मासोद येथील शेतकरी शेख परवीन शेख इसराईल यांनी दि. २७ सप्टेंबर २०१४ ला सोने तारण ठेवून २० हजार रूपयांची उचल केली. मात्र त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. लादगडचे ताराचंद कोवे यांनी सोने तारण ठेवून कर्जाची उचल केली. कर्जाची परतफेड करूनही दागिने परत देण्यास टाळाटाळ होत आहे. कोवे यांनी बॅँकेकडे कर्जाची मागणीसाठी कागदपत्र सादर केले. मात्र बॅँकेने कर्ज नाकारले. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान केल्यावर पंचनामा करून प्रकरण मदतीसाठी सादर केले. परंतु याचाही मोबदला मिळाला नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे. याबाबींची गांभीर्याने दखल घेवून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी) वन्य तलावाचे बांधकाम करावे मासोद व लादगड परिसर जंगल व्याप्त आहे. त्यामुळे श्वापदांचा वावर असतो. यामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. येथे वन्य तलावांचे बांधकाम केल्यास शेतकऱ्यांना श्वापदांचा त्रास कमी होईल, अशी मागणी प्रवीण घोडे, ताराचंद कोवे, गणपत धुर्वे, महेंद्र डेहनकर, सुभाष अलगुलवार, राणा प्रतापसिंह बघेल, शेख इसराईल यांनी केली आहे.
कर्ज पुनर्गठनासाठी आमदाराचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By admin | Published: June 24, 2016 2:18 AM