एक बडतर्फ तर दुसऱ्यावर निलंबनाची कारवाईवर्धा : कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभीच दाखवून दिले आहे. कामचुकारपणाकरित शिस्तभंग करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच केलेल्या या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यात हिंगणघाट तहसील कार्यालयाचा लिपिक आर.बी. काशीनिवास याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले, तर सेलू तहसील कार्यालयाचा वाहन चालक आर. व्ही. पानपाटील याच्यावर निलंंबनाची कारवाई करण्यात आली. हिंगणघाट तहसील कार्यालयातील लिपिक आर.बी. काशीनिवास याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमाच्या तरतुदीनुसार सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी निर्गमित केले आहेत. आर.बी. काशीनिवास हिंगणघाट तहसील कार्यालयात कार्यरत असून त्याच्याविरूद्धचे दोषारोप पूर्णत: सिद्ध झाले आहेत. हे आरोप गैरवर्तन या स्वरूपाचे असल्यामुळे त्यांनी शासकीय कामात कर्तव्यपरायणता न ठेवल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांवर जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)सेलू तहसीलचा वाहनचालक निलंबितरजेचा अर्ज सादर न करता वा कुणालाही सूचना न करता गैरहजर राहून शासकीय कामात व्यत्यय आणणाऱ्या सेलू तहसील कार्यालयातील वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यासंबंधीचे आदेश शनिवारी पारीत केले आहेत.वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याच्या वारंवार गैरहजेरीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सिद्ध होत आहे. शासकीय कर्तव्य बजावताना त्याने गैरवर्तन केले असून कर्तव्य परायनता दाखविली नाही. त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ चे नियम ३ चा भंग झाला आहे. शासकीय महत्त्वाचे काम करीत असताना वारंवार पूर्वपरवानगी न घेता रजेचा अर्ज सादर न करता कार्यालयात गैरहजर राहत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अन्वये शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यास पात्र ठरत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी विभागीय चौकशीच्या अधीन राहून पानपाटील याच्यावर निलंबिनाची कारवाई केली आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा
By admin | Published: June 07, 2015 2:18 AM