वर्धा : नवीन आर्थिक वर्षाचा चतुर्थ दिन असलेल्या सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालयाचा जप्ती आदेश धडकल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे येताच त्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना आपल्या दालनात पाचारण केले. त्यानंतर याचिकाकर्त्याला अडीच लाखांची रक्कम देण्यात आल्याने जप्तीची कारवाई टळली.
आर्वी येथील रहिवासी विवेकानंद कासार यांची सन २००२ मध्ये प्रकृती बिघडल्याने त्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. त्यानंतर विवेकानंद यांच्या हाताला गंभीर दुखापत होत त्यांचा हात कापावा लागल्याने त्यांना अपंगत्व आले. चुकीच्या उपचारामुळे आपला हात कापावा लागला, असा आरोप करीत विवेकानंद कासार यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.
दोन्ही बाजू लक्षात घेऊन २०१४ मध्ये जिल्हा न्यायालयाने विवेकानंद कासार यांच्या बाजूने निर्णय दिला. शिवाय, विवेकानंद कासार यांना नुकसानभरपाई म्हणून सुमारे ६.७३ लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत. बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने विवेकानंद कासार यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याच याचिकेवर सुनावणी होत न्यायालयाने विवेकानंद कासार यांच्या बाजूने निर्णय देत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने जप्तीचा आदेश दिल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. हाच आदेश घेऊन सोमवारी विवेकानंद कासार हे न्यायालयाच्या बेलिफ यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकारात्मक चर्चेअंती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून याचिकाकर्ते विवेकानंद कासार यांना नुकसानभरपाईच्या रकमेपैकी अडीच लाख देण्याचे निश्चित झाल्याने जप्तीची नामुष्की टळली, हे विशेष.
गुप्तता बाळगण्यात मानली गेली धन्यता
नेमक्या कुठल्या विषयी ही जप्तीची नामुष्की ओढावली आणि आता काय कार्यवाही केली जाईल याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याची प्रत्यक्ष भेटून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे त्यांनी भेटण्यासह बोलण्याचेही टाळले. एकूणच जिल्हा शल्य चिकित्सकांकडून या प्रकरणी कुठलीही माहिती प्रसार माध्यमांकडे जाऊ नये याबाबत मोठी गुप्तता बाळगण्यात आली.अडीच लाख मिळाले उर्वरित रकमेचे काय?
जप्तीचा आदेश धडकताच जिल्हाकचेरीत एकच खळबळ उडाली होती. सोमवारी याचिकाकर्ते विवेकानंद कासार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तातडीने अडीच लाख रुपये देण्यात आले. पण नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम कशी आणि कधी मिळणार, हे जिल्हा शल्यचिकित्सकांनी बोलण्याचे टाळल्याने कळू शकले नाही.
सन २००२ मध्ये प्रकृती बिघडल्याने विवेकानंद कासार हे आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. येथील चुकीच्या उपचारामुळे विवेकानंद कासार यांना एक हात गमवावा लागल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित प्रकरणी न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून विवेकानंद कासार यांना सुमारे ६.७३ लाख देण्याचा आदेश सन २०१४ मध्ये दिला. बराच कालावधी लोटून नुकसानभरपाईची रक्कम न मिळाल्याने विवेकानंद कासार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जप्तीचा आदेश दिला. तोच आदेश घेऊन याचिकाकर्ते विवेकानंद कासार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेत. त्यांना तातडीने अडीच लाख रुपये देण्यात आले आहे.
- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.