महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी ३१ ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार वर्धा जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असून त्यात १४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. हे मतदार जिल्ह्यातून चार आमदार निवडून देणार आहेत.विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रीया सुरू केली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव नोंदविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय आक्षपही मागविण्यात आले. त्यानंतर मतदार यादीत दुरूस्ती करून ती ३१ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर मतदार यादीनुसार वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १५ हजार ६६० इतके सर्वाधिक मतदार आहेत.तर आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ६२ हजार २३९, देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात २ लाख ७६ हजार ३ आणि हिंगणघाट मतदार क्षेत्रात २ लाख ९५ हजार ८४७ मतदार आहेत. विविध राजकीय पक्षांकडून सध्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. तर अनेक राजकीय पुढारी एखाद्या राजकीय पक्षाची तिकीट मिळेल या आशेवर आहेत.इतकेच नव्हे तर या पक्षातून त्या पक्षात जाणारेही सध्या आपल्या मनमर्जीने राजकीय पक्ष निवडत आहेत. असे असले तरी मतदार कुणाला बहुमत देत विजयी करतात हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. एकूणच निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पावसाळ्याच्या दिवसात तापत आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक महिला मतदारजिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्रातील महिला मतदारांचा विचार केल्यास वर्धा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक महिला मतदार आहेत. आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात १ लाख ३३ हजार ९२७ पुरुष व १ लाख २८ हजार ३१२ स्त्री मतदार, देवळी विधनसभा मतदार क्षेत्रात १ लाख ४२ हजार ४६८ पुरुष व १ लाख ३३ हजार ५३३ स्त्री मतदार, हिंगणघाट मतदार क्षेत्रात १ लाख ५२ हजार ५८८ पुरुष आणि १ लाख ४३ हजार २५९ स्त्री मतदार तर वर्धा विधानसभा क्षेत्रात १ लाख ५९ हजार ६०० पुरुष व १ लाख ५६ हजार ५७ स्त्री मतदार आहेत.हिंगणघाटात १२८ मतदार घटलेवर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात १ हजार ९७८, देवळी विधानसभा क्षेत्रात ३ हजार ३१२ तर आर्वी विधानसभा क्षेत्रात १ हजार ७२३ मतदार वाढले आहे. असे असले तरी हिंगणघाट मतदार क्षेत्रात लोकसभेच्या तुलनेत १२८ मतदार घटल्याचे ३१ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या यादीतून स्पष्ट होते.यंदा पूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी केवळ शपथपत्र आॅनलाईन अपलोड करण्यात आले होते. तर यंदा संपूर्ण प्रक्रियाच आॅनलाईन होणार आहे. इतकेच नव्हे, तर उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीचा वापर करूनच मिळणार आहे.उत्तरप्रदेशातून मिळाले यंत्रविधानसभा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असलेली प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मतदान यंत्र वर्धा जिल्ह्याच्या निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहे. ८६० बॅलेट युनिट, १ हजार ५३० कंट्रोल युनिट व १ हजार ६७० व्हीव्हीपॅट उत्तरप्रदेशातील फत्तेपूर येथून वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर काही बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट लोकसभेच्या निवडणुकीनंतर वर्धेच्या निवडणूक विभागाकडे शिल्लक होते. याचाच वापर विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी होणार आहे.ईएमएस पोर्टलद्वारे मिळणार आयोगाला माहितीविधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईएमएस पोर्टलचा वापर करण्यात येणार आहे. याच पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्याद्वारे वर्धा जिल्ह्याच्या चारही विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक कामाची माहिती निवडणूक आयोगाला मिळणार आहे.ईव्हीएमची प्रथम तपासणी पूर्णवर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी २ हजार ४८१ बॅलेट युनिट, १ हजार ३६३ कंट्रोल युनिट तर २ हजार ८० व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. या यंत्रांची प्रथम तपासणी नुकतीच पार पडली आहे. तर काही दिवसात या मशीन सील करण्यात येणार आहे.‘सुविधा’चा होणार वापरलोकसभा निवडणुकीच्यावेळी जिल्हास्तरावर निवडणूक विभागाची विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम झाली. त्यावेळी उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्या सहज उपलब्ध व्हाव्या या हेतूने सुविधा अॅपचा वापर झाला होता. तर यंदा विधानसभानिहाय या अॅपचा वापर होणार आहे. विशेष म्हणजे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी काम पाहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर ६,८८५ मतदार वाढलेलोकसभा निवडणुकीच्यावेळी वर्धा जिल्ह्यात एकूण ११ लाख ४२ हजार ८७३ मतदार होते. तर ३१ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार जिल्ह्यात सध्या ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीच्यावेळची मतदार यादी व नुकतीच प्रसिद्ध झालेली मतदारची तुलना केल्यावर ६ हजार ८८५ मतदार वाढल्याचे दिसून येते.