लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये थैमान घातल्यानंतर आता कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात थैमान घालू पाहत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धच असल्याचे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे वयाची साठी पार केलेल्यांनी सध्या अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस आरोग्य विभागाने जिल्ह्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट केले. या ऑडिटमध्ये सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड युनिटमध्ये मृत्यू झालेल्या १६५, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील काेविड युनिटमध्ये मृत्यू झालेल्या २२० मृत कोविडबाधितांच्या मृत्यूची कारणमीमांसा करण्यात आली. शिवाय, मृत व्यक्ती कुठल्या वयोगटांतील होती, याबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यात आली. या डेथ ऑडिटदरम्यान आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील १६५ कोविड मृतांपैकी २० ते ४० वयोगटांतील आठ, ४१ ते ६० वयोगटांतील ४५, तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या ११२ व्यक्ती असल्याचे पुढे आले. तसेच कस्तुरबा रुग्णालयातील २२० कोविड मृतांपैकी २० ते ४० वयोगटांतील ११, ४१ ते ६० वयोगटांतील ६५, तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या १४४ व्यक्ती असल्याचे पुढे आले असून तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
व्हॅक्सिन ठरतेय सुरक्षा कवच ४५ ते ६० आणि ६० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना सध्या कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जाणारी व्हॅक्सिन ही उपयुक्त असून ती सुरक्षाकवचासारखीच काम करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना संकटात प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे तसेच प्रत्येक लाभार्थ्याने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.