महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवठड्यात जिल्ह्यात कोरोनाने उच्चांकी गाठण्याचा प्रयत्न केला. याच काळात भविष्यातील धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३६ तासांसाठी सक्तीची संचारबंदी लागू केली होती. याच संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकांनी सार्वजनिक स्थळ निर्जंतुक केली. असे असले तरी सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर ८९.५ च्या घरात असून ९० दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पुन्हा लॉकडाऊन काय ही भीती कायम असतानाच २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल ४५ नवीन कोविड बाधित सापडल्याने लस आली; पण कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याची जाण अनेकांना झाली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनायनात प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे.
रिकव्हरी दर पोहोचला ९२.५७ टक्क्यांवरवर्धा जिल्ह्यात सध्या ९० दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. असे असले तरी जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९२.५७ इतका असल्याचे सांगण्यात आले.
सध्या जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ९० दिवसांनी दुप्पट होत आहे. शिवाय जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून पहिल्या फळीतील कोविड योद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. असे असले तरी अजूनही वर्धा जिल्ह्यावरील कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वर्धेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच.- डॉ. प्रभाकर नाईक,
अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.