महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच दिवशी तब्बल १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविड लस देऊन नवा विक्रम करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य विभागाची लसकोंडीच सध्या शासनाकडून केली जात आहे. मंगळवारी सायंकाळ विदर्भाच्या वाट्याचा लससाठा नागपूर येथे पोहोचला. पण वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे केवळ ८१० व्हायल देण्यात आल्याने लसीकरण मोहिमेला गती द्यावी कशी असा प्रश्न सध्या आरोग्य विभागा पुढे आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा उपलब्ध होत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकारी सांगत असले तरी प्रत्येक वेळी वर्धा जिल्ह्याला नाममात्र लससाठा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याची बोळवणूकच केली जात आहे. लससाठा उपलब्ध होताच आरोग्य विभाग नव्या जोमाने लसीकरण मोहिमेला गती देतो. असे असले तरी जिल्ह्यात लस घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने लसीकरण केंद्रांवरून अनेकांना बहूदा आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणी जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येत वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
केवळ २.५९ टक्के व्हॅक्सिन वेस्ट- सोमवारपर्यंत वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे एकूण ४ लाख २५ हजार ८० डोस प्राप्त झाले. त्यापैकी ४ लाख १४ हजार ३८ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ २.५९ टक्के लस वेस्ट झाली असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.
असे करण्यात आले लसीचे वितरण- जिल्ह्याला कोविड लसीचे ८ हजार १०० डोस प्राप्त झाल्यावर बुधवारी वर्धा शहरासाठी ८०० डोस, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयांसाठी ३०० डोस, आठ ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी २०० डोस तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला १७० डोस वितरणीत करण्यात आले आहे.
आज ५६ केंद्रांवरून होणार व्हॅक्सिनेशनमंगळवारी रात्री वर्धा जिल्ह्याला कोविड लसीचे ८ हजार १०० डोस प्राप्त झाले. ही लस जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पाठविण्यात आली आहे. गुरूवारी याच तोकड्या लससाठ्याच्या जोरावर आरोग्य विभाग ५६ केंद्रांवरून लाभार्थ्यांना काेविडची प्रतिबंधात्मक लस देणार आहे.