गणपती बाप्पा मोरया : ७०० होमगार्ड सुरक्षेसाठी तैनातवर्धा : सर्वांचे आराध्य दैवत असलेले आणि लहान मुलांचे आवडते गणपती बाप्पा गुरुवारी घराघरात तसेच मंडपांमध्ये स्थापित होत आहेत. त्यांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र संचारला आहे. मंडळेही सज्ज झाली आहे. मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवित आहे. सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चे सूर निनादत असून गणरायाच्या आगमनाचा उत्साह संचारल्याचे दिसत आहे. या काळात शांतता अबाधित राहावी व नागरिकांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्या मुंबईसारखा सार्वजनिक गणेशोत्सवाची झालर वर्धेत पाहावयास मिळत नसली तरी घरघुती गणपतीला जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याला पारंपरिकतेची जोड आहे. घराघरात व सार्वजनिक मंडळांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चिमुकलेही घरी गणपतीची सजावट करण्यात गुंतले आहेत. मोठ्या मूर्तींना अखेरचा हात फिरविला जात आहे. शहराबाहेरील मूर्तीकारही शहरात मूर्ती विकण्यासाठी दुकाने मांडून बसले आहेत. यातील बहुतेक मूर्ती बुक झाल्या असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यातही मल्हार रूपातील गणेशाची मूर्ती लक्षवेधी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)
बाप्पाच्या आगमनासाठी जिल्हावासी सज्ज
By admin | Published: September 17, 2015 2:47 AM