हिंगणी येथे स्वागत : गांधी जयंतीला मुंबईतून यात्रेस प्रारंभसेलू : संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी २ आॅक्टोबर रोजी मुंबई येथून निघालेला पालखी रथ नागपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झाला. हिंगणी येथे या रथाचे स्वागत करण्यात आले. संत गाडगे बाबा यांचा स्वच्छतेचा संदेश राज्यात पोहोचविता यावा ॅम्हणून तत्कालीन सरकारने गाडगेबाबा यांना ‘बेडफोर्ड’ कंपनीचे वाहन १ मार्च १९५० रोजी दिले होते. याच वाहनाने गाडगेबाबांनी राज्यात कानाकोपऱ्यात जाऊन कीर्तनाद्वारे प्रबोधन करीत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या गाडीच्या प्रवासातच २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबांचे देहावसान झाले. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले वाहन ट्रकवर सजवून ठेवले. या ऐतिहासिक रथाच्या स्वागताला वर्धा जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, हिंगणीचे उपसरपंच अरुण कौरती, ग्रा.पं. सदस्य दामिनी डेकाटे, व्यंकटी सोनुले, प्रभाकर किरडे, माला मुडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. रथ पूजनानंतर कलापथकाने नाटिकेतून स्वच्छतेचा संदेश दिला. या स्वच्छता अभियानात नागरिकांना सामावून घेण्यासाठी मेश्राम, विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, राजेंद्र बुंदीले, स्वच्छ भारत अभियानचे प्रवीण बुळकुंडे, संपदा अर्धापुरकर, सचिन खाडे, महेश डोईजोड, सुमित गावंडे, विनोद खोब्रागडे यासह सहकारी परीश्रम घेत आहे. हिंगणीत ग्रामविकास अधिकारी इश्वर मेसरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जीवनोन्नती अभियानाच्या सुप्रिया कांबळे, सर्व सहकारी, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. गाडगे-बाबांच्या पदस्पर्शाने धन्य या रथाचे सारथ्य दिलीप सींग व अशोक भोंडवे करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी रथाचे जिल्ह्यात आगमण
By admin | Published: November 13, 2016 12:42 AM