सेलू : येथील मुख्य महामार्गावर यशवंत चौकापासून पुढे रस्त्याचे सौंदर्यीकरण करताना काही वर्षापूर्वी तयार केलेले रस्तादुभाजक पूर्णत: मोडकळीस आले आहेत. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या या रस्ता दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांकरिता जीवावर बेतणारे ठरत आहे. त्यामुळे दुभाजकांची दुरुस्ती करीत वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. येथील मुख्य महामार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम केल्यानंतर यशवंत चौकापासून पुढे बोरधरण चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता दुभाजक तयार करण्यात आले होते. याकरिता शासनाने लाखो रुपये खर्च केला. या मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून येथे हे रस्ता दुभाजक तयार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच या दुभाजकांची स्थिती वाईट झाली. यात झालेल्या गैरप्रकारामुळे हे दुभाजक आज ठिकठिकाणी तुटलेले आहे. वाहनचालक कोठूनही आपले वाहन मुख्य रस्त्यावर आणतात. यामुळे अपघाताचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहे. झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले. महामार्गावर सदोषपणे दुभाजकांची निर्मिती करण्यात आल्याने वाहतुकीची समस्या उभी ठाकत आहे. तसेच मार्गावरील विजेचे खांब काही ठिकाणी झुकलेले असल्याने प्रचंड काळोख असतो. मार्गावरुन लहान-मोठी वाहने सारखी धावत असतात.यामुळे इतर वाहनांना रस्ता ओलाडतांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. शिवाय तुटलेले दुभाजक वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. याकडे लक्ष देत दुभाजकांची दुरुस्ती करुन वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
दुभाजक बेतताहेत वाहनचालकांच्या जीवावर
By admin | Published: June 01, 2015 2:22 AM