आॅनलाईन लोकमतहिंगणघाट : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून रस्ता निर्मितीप्रसंगी दुभाजकांची निर्मिती करण्यात आली; पण त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे कधीही लक्ष देण्यात आले नाही. परिणामी, सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजक बेपत्ता झाले असून पथदिव्यांचे खांब रस्त्यावर आले आहेत. यामुळे वाहतुकीतील अडचणी वाढल्या असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील रूबा चौक ते रेल्वे स्थानक मार्गावर रस्त्याची निर्मिती करताना दुभाजकांची निर्मिती करण्यात आली होती. सदर दुभाजकांमध्ये पथदिव्यांचे विद्युत खांबही लावण्यात आले होते. कित्येक वर्षांपूर्वी झालेले हे रस्ता दुभाजक कधी दुरूस्तच करण्यात आले नाहीत. या विपरित रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती मात्र अनेकदा करण्यात आली. परिणामी, या मुख्य रस्त्यावरून दुभाजकच बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. दुभाजकांच्या जागांवर रस्त्यांच्या मधोमध पथदिव्यांचे खांब उभे आहेत; पण दुभाजक नसल्याने वाहने कुठूनही वळविली जातात. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. दुभाजक बेपत्ता झाल्याने या मार्गावर आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यात अनेकांना जखमी व्हावे लागले. नागरिरकांनी दुभाजकांच्या निर्मितीची मागणी केली; पण त्याकडे लक्ष देण्यास नगर पालिका तथा सार्वजनिक बांधकाम विभागालाही वेळ नसल्याचे दिसून येत आहे.रूबा चौक ते रेल्वे स्थानक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर न्यायालय, तहसील कार्यालय, शाळा, महाविद्यालये, दवाखाने तथा अनेक प्रतिष्ठाणे आहेत. शिवाय तेलंगखडी वॉर्ड परिसराला जोडणारा हा मार्ग असल्याने प्रचंड वर्दळ असते. रस्त्याचे दुभाजकच बेपत्ता झाल्याने या मार्गाने ये-जा करणे कठीण झाले आहे. गुळगुळीत रस्ते, सौंदर्यीकरण केलेले रस्ता दुभाजक आणि मध्यभागी असलेले पथदिवे हे शहराची शोभा वाढविणारे ठरतात; पण शहरातील भग्न आणि बेपत्ता झालेले दुभाजक व रस्त्याच्या मधोमध उभे असलेले पथदिव्यांचे खांब शहर विद्रूप करीत असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत शहरातील रस्ता दुभाजक व्यवस्थित करून शहराचे सौंदर्यात भर घालणे गरजेचे झाले आहे.कुठूनही वळणारी वाहने ठरतात चिमुकल्यांना धोकादायकशहरातील रूबा चौक ते रेल्वे स्थानक मार्गावरील रस्ता दुभाजक पूर्णत: नष्ट झाले आहेत. अनेक ठिकाणी तर दुभाजकांचे अवशेषही दिसत नाहीत. परिणामी, वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. ये-जा करणारी वाहने कुठूनही वळण घेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असून या मार्गावर शाळा, महाविद्यालये तथा चिमुकल्यांचे कॉन्व्हेंटही आहे. चिमुकल्यांनाही याच रस्त्याने ये-जा करावी लागते. दुभाजक नसल्याने वाहने कुठूनही वळून चिमुकल्यांच्या अपघातास कारणीभूत ठरतात.
दुभाजक बेपत्ता; खांब रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:08 PM
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून रस्ता निर्मितीप्रसंगी दुभाजकांची निर्मिती करण्यात आली; पण त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे कधीही लक्ष देण्यात आले नाही.
ठळक मुद्देनगर पालिका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : वाहतुकीच्या अडचणींमध्ये वाढ