लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे. रविवारी नागपूर विभागीय कृषी संचालकांसह डझनभर अधिकाऱ्यांनी निजामपूरात दाखल होऊन कपाशीच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्येक झाडाजवळ त्यांनी पाहणी करून या परिसरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘हायअलर्ट’ राहण्याचा इशारा जारी केला आहे.मागील वर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकºयांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहेत. यावर मात करण्यासाठी उन्हाळ्यातही कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. तरीही गुलाबी बोंडअळी खरीपाच्या सुरूवातीलाच आढळून आल्याने कृषी विभागासह शेतकरी पुरता हादरून गेला आहे. त्यानंतर रविवारी विभागीय कृषी संचालक घाडके, वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, आर्वीचे उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, तालुका कृषी अधिकारी गुल्हाणे, डॉ. उंबरकर, डॉ. नाईक, कृषी विस्तार अधिकारी संजय दुबे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निकम, निजामपूरचे सरपंच प्रवीण वैद्य, शेतकरी सुरेश भांगे आदी उपस्थित होते.यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी भांगे यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली. येथे बोंडअळीचा मोठा प्रकोप झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जर बोंडअळीचा प्रकोप वाढला तर पुढील वर्षी कपाशीचे पिक लावूच नये असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला. त्याशिवाय अळ्या पूर्ण नष्ट होणार नाही. असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या आर्वी येथील अधिकाऱ्यांकडून शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आठ आठ दिवस कृषी सहाय्यक गावांमध्ये जात नाही अशी तक्रार जि.प. सदस्य ज्योती निकम यांनी यावेळी नोंदविली.
विभागीय कृषी संचालकांसह डझनभर अधिकारी निजामपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:13 AM