फराळाचे वाटप : अनुभवांची देवाण-घेवाणहिंगणघाट : भारतीय माजी सैनिक संघ, हिंगणघाट यांच्यावतीने सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या घरी भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांनी प्रत्यक्षरित्या घरी जाऊन दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. पाकिस्तान सिमेवरती तणावजन्य स्थिती असल्यामुळे दिवाळी सारख्या सणाला सैनिकांना सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे सैनिकांना घरी येता आले नाही. याचे दु:ख सैनिक परिवारांच्या चेहऱ्यावर दिसत होते. असे असले तरी परिवारातील सदस्यांना याचा अभिमान असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. माझा मुलगा किंवा माझा पती देशाचे रक्षण करीत आहे. आम्हाला त्यातच खरा आनंद आहे. लवकरच स्थिती सामान्य होवून सैनिकांना सुट्टी मिळेल, तोच दिवस आमच्यासाठी दिवाळी सारखा राहील, अशा भावना व्यक्त केल्या. ‘आप्त येती घरा, तोच दिवाळी दसरा’ हेच शब्द सैनिक कुटुंबातून ऐकायला मिळाले. यावेळी माजी सैनिकांनी स्वत:च्या अनुभवाबद्दल चर्चा केली. मेजर डॉ. देवेंद्र घोरपडे, कॅप्टन रतनलाल शर्मा, पुंडलिक बकाने, प्रवीण हेलवटकर, बाबाराव तेलरांधे, गोविंदराव रणदिवे, श्रीरंग उरकुडकर यांनी सैनिक परिवारांचे मनोबल वाढविण्यासाठी माजी सैनिक तसेच संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला. या उपक्रमाला महेंद्र लाखे, तुळशीराम पटले, सुधाकर जामखुटे, शंकर फाले, अजाबराव भोंग, दिलीप वाघमारे, सुधाकर दांडेकर, अतुल शेट्ये, गजानन दातारकर, श्रीराम लोणकर, रामभाऊ गायकवाड, शंकर देशमुख, रमेश गौळकर, आबा बोखले, मधुकर भोयर, श्याम भट, अरूण मुटे, किरण जोशी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
माजी सैनिक संघातर्फे सैनिक परिवारासोबत दिवाळी
By admin | Published: November 10, 2016 1:02 AM