लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे. पण शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धेकरांची अपेक्षापूर्ती कशी करणार हा मोठा प्रश्न नगरसेवकांपुढे आहे. त्यामुळे पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका, अशी मागणी करीत सर्व नगरसेवकांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ना. डॉ. रणजित पाटील वर्धेत आले होते. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचत तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रात राज्यात आणि वर्धा नगर पालिकेतही भाजपाची सत्ता असताना आणि विकास कामे करण्याकरिता पालिकेकडे सक्षम यंत्रणा असताना पालिकेच्या हक्काचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला जातो. यामुळे नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या मागण्यांना न्याय देऊ शकत नाही. तरीही पालिका स्वत:च्या खर्चातून विकास कामे करीत आहेत. आज पालिकेच्या इमारतीला जवळपास ८ कोटी रुपयांची गरज आहे. जलतरण तलावाचे काम सुरू असून त्याला १ कोटी १० लाख रुपयांची गरज असताना तोटका निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापन व मल:निस्सारणचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. पण, शासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याने या विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. शहरातील वाहतूक आणि पार्कींगच्या दृष्टीने टिळक मार्केटचा प्लॅन तयार करण्यात आला. पण, निधी अभावी तो गुंडाळून ठेवला आहे. सत्ता असतानाही केवळ राजकीय वर्चस्वापोटी पालिकेला निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारीचा ओघ पाहून ना. पाटील थक्क झाले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपा शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, गटनेता प्रदीप ठाकरे, सुनील गफाट यांच्यासह इतरही नगरसेवक उपस्थित होते.शहरातील कचरा संकलनाकरिता नगरपरिषदेला २२ वाहने लागतात. मात्र निधी नसल्याने पालिका हे काम केवळ १० वाहनाच्या माध्यमातून करीत आहे. पालिका नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे पण शासन निधीत अडवणूक करीत असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.
पालिकेला राजकीय षडयंत्राचा बळी पडू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:32 AM
राज्यात उत्कृष्ट नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालिकेत भाजपची सत्ता असतानाही निधीची कोरड आहे. शहराच्या विकासासाठी येणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला जातो. एकीकडे पालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध विकास कामे पालिका स्वत:च्या निधीतून पूर्ण करण्याचे धाडस दाखवत आहे.
ठळक मुद्देरणजित पाटील यांची वर्धेत बैठक : नगरविकास मंत्र्यांपुढे नगरसेवकांनी मांडले गाऱ्हाणे