वर्धा : कारंजा पोलिस ठाण्यात साडे आठ महिन्यांपूर्वी दाखल हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. डोरीवाल ऊर्फ राजू बन्सीलाल नागवंशी (रा. जरूड, ता. वरुड, जि. अमरावती) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, गाय चोरी व पैशाच्या वादातून त्याची सावळी खुर्द येथील ओम नामदेव पठाडे (३६) आणि सुनील वामन ढोबाळे यांनी हत्या केल्याचे पुढे आले आहे. या दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्र परिषदेत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली.
नागपूर-अमरावती महामार्गावर कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ६० ते ६५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने कारंजा पोलिस ठाण्यात ३० मार्च २०२२ रोजी हत्येच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यावर तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
नागपूर-अमरावती महामार्गावरील दोन टोल नाक्यांवरील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची पाहणी करून सात हजार वाहने तपासण्यात आली. शिवाय तांत्रिक बाबींवर भर देत नागपूर शहर व ग्रामीण, अमरावती शहर व ग्रामीण, भंडारा, गाेंदिया तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशांतील पोलिसांकडून अधिकची माहिती जाणून घेण्यात आली; पण मृतकाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचे रहस्य गुलदस्त्यात कायम होते. अशातच गुन्ह्यांसंदर्भातील आढावा बैठकीत हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणाकडे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचे लक्ष गेले.
अधिकची माहिती जाणून घेतल्यावर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. याच पथकाने नव्या जोमाने प्रयत्न केल्यावर त्यांना कोंढाळी पोलिस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल असल्याचे निदर्शनास आले. सदर तक्रारदारांशी पोलिसांनी संपर्क केल्यावर मृतकाची ओळख पटली. पोलिसांनीही अधिकची माहिती जाणून घेत ओम पठाडे व सुनील ढोबळे यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
२५ हजारांचा रिवॉर्ड
तब्बल साडेआठ महिन्यांनंतर हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याच उल्लेखनीय कामगिरीची पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दखल घेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना २५ हजारांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे.
हेटीकुंडी फाट्याजवळ आढळला होता मृतदेह
नागपूर-अमरावती महामार्गावर हेटीकुंडी फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडल्याने या प्रकरणी जामणी येथील पोलिस पाटील रोशन निळकंठ बनसोड यांच्या तक्रारीवरून ३० मार्च २०२२ रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला; पण मृतकाची ओळख पटली नव्हती. शिवाय आरोपीही पोलिसांना गवसले नव्हते. तर आता या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
...अन् पटली मृताची ओळख
या प्रकरणाचा नव्या जोमाने समांतर तपास सुरू असताना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलिस स्टेशन येथे दाखल मिसिंगची माहिती पोलिसांना मिळाली. अधिकची माहिती जाणून घेतल्यावर इसमाचे वर्णन संबंधित गुन्ह्यातील मृतकाच्या वर्णनाशी मिळत असल्याने पोलिसांनीही आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजू नागवंशी याचा मुलगा व पत्नीकडे छायाचित्र दाखवून विचारणा केल्यावर मृतकाची ओळख पटली.
पैसे परत करायला देत होता नकार
पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत विचारणा केली असता ओम पठाडे त्याच्याकडे तीन गायी मृतकाने चोरी करून विकल्या. शिवाय उसने घेतलेले १४ हजार रुपये परत देण्यासाठी नकार देत होता. याचाच राग मनात धरून नियोजनबद्धपणे हत्येचा कट रचण्यात आला. डोरीलाल याला दुचाकीने वर्धा जिल्ह्यात आणून त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यास गतप्राण करून घटनास्थळावरून पोबारा केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.