लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: इंग्रजी माध्यमांकडे पालकांना कल वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळती लागली आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांना गतवैभव प्राप्त करुन देण्याकरिता शासनस्तरावर विविध उपाययोजना राबवून शिक्षकही मेहनत घेत आहे. पण, जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक अधिकारी व मोठे व्यक्ती घडले आहे. पण, आता काळानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पेव फुटले. पालकांनीही जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाट धरली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या चिंतेचा विषय ठरली. गेल्या चार वर्षांपासून शासनाने याकडे लक्ष केंद्रीत करुन कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले. सरुवातील २० पटसंख्या असलेल्या शाळा समायोजित करण्यात आल्या. आता शालेय शिक्षण विभागाने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. यातील बहुतांश शाळांमध्ये दहा पेक्षा कमी तर पाच पेक्षा अधिक पटसंख्या आहे. काही शाळांमध्ये बरोबर दहाच विद्यार्थी दाखविल्या जात आहे. आता दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन कमी पटाची शाळा कायमचीच ह्यलॉकडाऊनह्ण करण्याच्या हालचाली शासनस्तरावरुन सुरु झाल्या आहे. पण, सध्याच्या कोरोना प्रकोपामुळे हा निर्णय लांबणीवर पडणार की अंमलबजावणी होणार, हे येणारी वेळच सांगणार आहे.शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीशालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या दहापेक्षा कमी पटसंख्येच्या यादीमध्ये वर्धा जिल्ह्यातील ७३ शाळांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत समायोजन करुन त्या बंद केल्या तर एका शाळेत किमान दोन शिक्षक, या प्रमाणे विचार केल्यास १४६ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यासोबतच शाळेची इमारत, शाळेतील इतर साहित्यही बेवारस राहण्याची शक्यता आहे.गुणवत्ता वाढण्याऐवजी घसरलीज्या शाळेत कमी विद्यार्थी असतात त्या शाळेची गुणवत्ता अधिक राहते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. जिल्हा परिषदेतच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही गुणवत्ता वाढण्याऐवजी घटल्याचेच दिसून येते. शाळेत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी असल्यास त्यांना शिकविण्याचीही मानसिकता होत नाही. त्यामुळे कमी पटसंख्याही गुणवत्तेवर परिणामकारक ठरली आहे.
वर्धा जिल्ह्यातील डाऊन पटसंख्येच्या शाळा कायमस्वरूपी होणार लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 1:20 PM
वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील जवळपास ७३ शाळांमधील पटसंख्या ही दहाच्या आतच असल्याने या शाळा कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील ७३ शाळांवर येणार गंडांतर दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची यादी धडकली