दुरूस्ती गरजेची : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेसमुद्रपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पाठीमागून भेगा गेल्या आहेत. शिवाय पुतळा जीर्ण होत असल्याने तो कधीही, ढासळू शकतो. देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. किमान हे औचित्य साधून अनुचित प्रकार टाळण्याकरिता सदर पुतळा खाली उतरवून ब्रांझ धातूचा पुतळा बसवावा, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनही सादर करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकसान झाल्यास अनुयायी, समर्थक तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. असे होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामुळे प्रशासनाने वेळीच सदर पुतळ्याची पाहणी करून डॉ. आंबेडकरांचा सदर पुतळा खाली घ्यावा आणि नवीन ब्रांझ धातूचा पुतळा तेथे स्थापित करावा. या कार्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गोकूल पांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना शिष्टमंडळात रिपाइंचे जिल्हा सचिव अॅड. नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष अॅड. अनिल ओरके, अॅड. आशिष मेश्राम, अॅड. नंदकुमार बोरकर आदी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाच्या प्रती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, तहसीलदार समुद्रपूर, नगर पंचायत मुख्याधिकारी समुद्रपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा व स्थानिक प्रशासनाने या पुतळ्याच्या मागणीकडे त्वरित लक्ष देत १४ एप्रिलपूर्वी कारवाई करण्याचा प्रयत्न करावा, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला.(तालुका प्रतिनिधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पडल्या भेगा
By admin | Published: March 20, 2016 2:14 AM