संस्काराचे मोती उपक्रम : वर्धेच्या सेजल मगरचे हवाई सफारीबद्दल मनोगतलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपल्याला कधीतरी विमानात बसायला मिळेल, असे स्वप्न होते. पण शाळेत असतानाच विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे वाटले नव्हते. केवळ ‘लोकमत’ मुळेच ते स्वप्न पूर्ण होऊ शकल्याचे वर्धेतील म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरातील सेजल जयपाल मगर हिने सांगितले. ती प्रारंभीपासूनच संस्काराचे मोती उपक्रमात सहभाग घेत आहे. यात तिला तिची लहान बहीण नियमित कुपन गोळा करण्याकरिता मदत करते. संस्काराच्या मोतीच्या माध्यमातून हवाई सफारीवरून आलेल्या मुलांच्या मुलाखती ‘लोकमत’ मध्ये वाचल्या. आज मला ही संधी मिळाली, म्हणत आपण जाम खुश असल्याचे सेजल म्हणाली. सेजल महिलाश्रम बुनियादी प्राथमिक शाळेची सातवीतील विद्यार्थिनी आहे. नागपूर ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान तिने राष्ट्रपती भवनाला दिलेली भेट, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यासोबत साधलेला संवाद याविषयी ती भरभरून बोलत होती. पहिल्यांदा विमानात बसणार असल्याने उत्सुकता तर होतीच पण थोडी भीतीही वाटत होती. विमानाने उड्डाण घेतल्यावर आपण ढगात आहो, हे खिडकीतून पाहिले आणि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींची आठवण झाली. विमान दिल्लीच्या एअरपोर्टवर पोहोचल्यावर आमच्यासाठी आलिशान ट्रॅव्हल्स आली. यात बसल्यावर आम्हाला रेल्वे म्युझियमला नेले. संग्रहालय पहिल्यांदाच पाहत असल्याने खूपच नवल वाटत होते. तिथे आम्हाला जुने रेल्वे इंजिन, सीट्स, डब्बे पाहायला मिळाले. प्रत्येक वस्तूबाबत ‘लोकमत’चे पथक माहिती देत होते. त्यामुळे सगळ सहजरित्या कळलं. यानंतर इंदिरा गांधी स्मृती भवन, गांधी स्मृती भवन पाहिल्यावर राष्ट्रपती भवनात गेलो. तिथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत छायाचित्र घेतले. मग उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आम्हा मुलांना भविष्यात काय व्हायचे आहे, असे प्रश्न विचारले. सोबत पेन, टी शर्ट कॅप असे गिफ्टही दिले. हा प्रवास कधीच विसरता येऊ शकणार नाही.दरवर्षी लोकमत संस्काराच्या मोतीमुळे जिल्ह्यातील एका मुलाला विमान प्रवासाची संधी मिळते. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लोकमतने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता भविष्यात असेच उपक्रम राबवावे, अशा प्रतिक्रीया सेजलचे वडील जयपाल मगर यांनी व्यक्त केल्या.लोकमत संस्काराचे मोती या सदरात येणारी माहिती अभ्यासाकरिता पूरक असते. अशा प्रतिक्रीया सेजलने यावेळी व्यक्त केल्या. केवळ भेटवस्तू मिळतात म्हणून या स्पर्धेत सहभागी न होता आपल्याकडे उपयुक्त माहितीचा संचय होतो म्हणून सहभागी झाले पाहिजे असेही तिने सांगितले. सेजलने कात्रणांची वही तयार केली असून क्राफ्टच्या वस्तू तयार करण्यासाठी यातील टिप्स उपयुक्त ठरत असल्याचे ती म्हणाली.
विमान प्रवासाचे स्वप्न झाले साकार
By admin | Published: June 27, 2017 1:13 AM