लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील तब्बल अकरा शासकीय रुग्णालयांत मागील साडेतीन वर्षांपासून 'कफ सिरप'चा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोकल्याच्या औषधाच्या पुरवठ्याकडे संबंधित दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असले तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस उंटावरून शेळ्या हाकलत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालये येतात; पण मागील साडेतीन वर्षांपासून जिल्ह्याच्या स्थळी असलेल्या औषध भांडाराला वारंवार मागणी करून कफ सिरपचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयासह दोन उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालयात सध्याच्या स्थितीत कफ सिरपचा दुष्काळच निर्माण झाला आहे. कफ सिरपच्या दुष्काळामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवून आरोग्य सेवा घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजूंना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी, या प्रकरणी आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
किमान ७५८ औषधांची झाली मागणी- यंदा मे २०२२ मध्ये आवश्यक औषधांची मागणी संबंधितांकडे नोंदविण्यात आली. या औषधांमध्ये सुमारे ७५८ औषधांचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे १०८ औषधांचा पुरवठा आतापर्यंत झाला असला तरी त्यात कप सिरपचा समावेश नाही. त्यामुळे या प्रकरणी आता आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
संबंधितांचे वार्षिक मागणीकडेही दुर्लक्ष- जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य औषध भांडार प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी मे महिन्यात गरज भासणाऱ्या औषधांची वार्षिक मागणी नोंदविली जाते. गत साडेतीन वर्षांत नोंदविण्यात आलेल्या मागणीत कफ सिरपचाही समावेश आहे; पण कफ सिरपचा पुरवठा करण्याकडे संबंधित दुर्लक्षच करीत आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक वरिष्ठांना कफ सिरपची गरज का हे पटवून देण्यात असमर्थ ठरत असल्याची चर्चा सध्या होत आहे.
शासकीय डॉक्टर अन् आरोग्य कर्मचाऱ्यांवर अनेकांचा विश्वास- जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील विविध भागातील ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर अनेकांचा विश्वास आहे. त्यामुळे या शासकीय रुग्णालयांत आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मागील केवळ सहा दिवसांचा विचार केल्यास वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ हजार २५८ नागरिकांनी बाह्य रुग्णसेवेचा लाभ घेतल्याचे वास्तव आहे.